मुंबई : 'म्हाडा'च्या मास्टर लिस्टवर नोंद असलेले आणि संक्रमण शिबिरात राहणारे मूळ भाडेकरू अथवा त्यांच्या वारसदारांना घरे देण्यात येणार असून त्यांच्या ऑनलाइन नोंदणीस सुरुवात झाली आहे. ३१ जानेवारीपर्यंत ही नोंदणी सुरू राहणार असून, त्यानंतर अर्जदाराच्या कागदपत्रांची पडताळणी करून त्यांची पात्रता निश्चित करण्यता येईल आणि पात्रतेनुसार त्यांना घर देण्यात येईल, अशी माहिती आता 'म्हाडा'कडून देण्यात आली आहे.
कोणी अर्ज करावा? मास्टर लिस्ट समितीने यापूर्वी ज्यांना पात्र म्हणून घोषित केले आहे, त्यांनी नव्याने अर्ज करू नये. ज्यांनी ऑनलाइन अर्ज केला आहे, अशांनी नव्याने अर्ज करू नये. मात्र, ज्यांनी यापूर्वी मास्टर लिस्टकरिता ऑफलाइन अर्ज केला आहे; परंतु त्यांचे प्रकरण प्रलंबित आहे, अशा व्यक्तींनी नव्याने ऑनलाइन अर्ज दाखल करावा.
नोंदणी करताना काय? नोंदणी करताना मोबाइल नंबर, ई-मेल, रंगीत फोटो, हस्ताक्षर किंवा अंगठ्याच्या ठशाचा फोटो, आधारकार्ड, व्हेकेशन नोटीस, जुन्या इमारतीतील गाळ्यांची भाडेपावती, वीजबिल, संक्रमण शिबिरातील घराचे वितरण आदेश व ताबा पावती, हस्तांतरण करारनामा कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहेत.
कागदपत्र सादर करा अर्ज केल्यानंतर अर्जदाराने स्वतः प्रमाणित केलेले, अर्जासोबत ऑनलाइन सादर केलेले कागदपत्र ३० दिवसांत म्हाडा मुख्यालयात सादर करावे.
नोटीस देऊन ज्या 'सेस' इमारती रिकामी करण्यात आल्या, तेथील रहिवासी किंवा अरुंद भूखंड, आरक्षण, रस्ता रुंदीकरण आदींमुळे या इमारतीचा पुनर्विकास शक्य झाला नाही, तसेच पुनर्बाधणीत घरे कमी बांधली गेल्याने ज्यांना घरे मिळालेली नाहीत, असे भाडेकरू किंवा त्यांचे वारसदार संक्रमण शिबिरात राहतात. त्यांची नोंद मास्टर लिस्टवर केली असून त्यांच्याकडून वा त्यांच्या वारसदारांकडून घर पात्रतेसाठी नोंदणी प्रकिया सुरू आहे.- मिलिंद शंभरकर, मुख्य अधिकारी, मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळ