लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : ‘म्हाडा’कडून मुंबईसह राज्यभरात वृक्षारोपण मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून, सामाजिक बांधिलकीतून दोन लाख झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शिवाय लवकरच जिओ-टॅगिंग प्रणालीद्वारे झाडांची नोंदणी आणि संवर्धन करण्यात येणार आहे. तसेच समुद्रकिनारी पर्यावरणाचे संवर्धन करणारी खारफुटी अर्थात कांदळवन उभारण्याचे नियोजनही सुरू आहे.
पहिल्या टप्प्यात मुंबई महानगर क्षेत्रात सुमारे ५० हजार झाडे लावण्याचे काम सुरू झाले आहे. मुंबई मंडळातर्फे ५० हजार व कोकण मंडळातर्फे २५ हजार झाडे लावली जात आहेत. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर व अमरावती विभागीय मंडळ प्रत्येकी २५ हजार झाडे लावणार आहेत. मुंबई मंडळातर्फे विक्रोळीतील कन्नमवार नगर, मालाडमधील मालवणी आणि गोरेगाव येथे या उपक्रमाचा प्रारंभ झाला.
...येथे अंमलबजावणीनाशिक मंडळातर्फे निमोण (ता. चांदवड, जि. नाशिक) येथील जैवविविधता उद्यानात १५ हजार झाडे, तर सोलापूर जिल्ह्यातील कुंभारली येथील गृहनिर्माण प्रकल्प परिसरात पुणे मंडळातर्फे ९,५०० वृक्ष लावण्यात आले. नागपूर मंडळातर्फे चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा नांदा (ता. कोपर्णा) येथे एक हजार झाडे, तसेच सोलापूर जिल्ह्यातील धाराशिव येथे १३ एकर जागेवर वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
हरित आवरण वाढविण्याची मोहीम नसून भावी पिढ्यांसाठी निरोगी व समृद्ध पर्यावरणाची शाश्वती देणारे पाऊल आहे. राज्याच्या विकास प्रवासात नवीन घरे उभारणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पर्यावरणाचा समतोल राखणेही आवश्यक आहे. शहरांच्या विकासाबरोबर सावली देणारी झाडेही वाढली पाहिजेत.संजीव जयस्वाल, उपाध्यक्ष, म्हाडा