लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरांच्या लॉटरीसाठीच्या ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेची सुरुवात सोमवारी झाली. म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्याकरिता अधिकृत वेबसाइट असून, या व्यतिरिक्त कुठल्याही अनधिकृत वेबसाइटवर अर्जदारांनी लॉटरीत सहभाग घेऊ नये. कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये. कोणतेही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले.
संजीव जयस्वाल म्हणाले, कोकण मंडळातर्फे मोठ्या संख्येने सदनिका आणि भूखंड उपलब्ध केले आहेत. मुंबईच्या जवळच घरे असल्याने अधिकाधिक नागरिकांनी या सोडत प्रणालीमध्ये सहभाग घ्यावा. म्हाडाच्या संगणकीय सोडतीकरिता वापरण्यात येणारी संगणकीय सोडत प्रणाली अत्यंत सोपी, सुलभ, सुरक्षित आहे, असे ते म्हणाले. वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमाला मुंबई इमारत दुरुस्ती मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, मुख्य अभियंता सुनील नन्नावरे, कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर उपस्थित होते.
सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावरूनच सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील.
म्हाडा अधिकारी-कर्मचारी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे रोख रकमेची मागणी केली जात नाही, याची अर्जदारांनी नोंद घ्यावी. कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट नेमलेले नाही. त्यामुळे दलालाच्या प्रलोभनांना बळी पडू नये. फसवणुकीस म्हाडा जबाबदार राहणार नाही.रेवती गायकर, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये या योजनेअंतर्गत १६७७ घरेएकात्मिक शहर गृहनिर्माण योजने अंतर्गत ३,००२ घरे
सर्वसमावेशक योजनेअंतर्गत एकूण ५६५ घरे
म्हाडा कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५० टक्के परवडणाऱ्या सदनिका) ४१ घरे