मुंबई : 'म्हाडा'च्या कोकण मंडळाची घरे विक्रीभावी पडून राहत असल्याची ओरड होत असतानाच दुसरीकडे यावेळेच्या कोकण मंडळाच्या ५ हजार २८५ घरे आणि ७७ भूखंडांच्या विक्रीसाठीच्या लॉटरीला तुफान प्रतिसाद लाभत आहे. सोमवारी सायंकाळी पावणेसात वाजेपर्यंत घरांसाठी ६७ हजार ५३९ अर्ज आले असून, त्यापैकी ४० हजार ९९८ अर्जदारांनी अनामत रक्कमेचा भरणा केला आहे.
कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये ठाणे येथील कौसा, डोंबिवली, कल्याण, टिटवाळा, नवी मुंबई, वसई, पालघर, मिरारोड, कावेसार, बाळकुम, शिरढोण, गोठेघर येथे घरे आहेत. यापैकी ठाणे आणि नवी मुंबईमधील घरांकडे अर्जदरांचा अधिक ओढा असल्याचे 'म्हाडा'मध्ये होत असलेल्या चौकशीतून समोर येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
लॉटरीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १३ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत आहे. १४ ऑगस्टच्या रात्री ११:५९ वाजेपर्यंत अनामत रकमेचा भरणा ऑनलाइन करता येईल. २१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजता अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध होईल. २५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्जदारांना दावे व हरकती नोंदविता येतील. १ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता अर्जाची अंतिम यादी प्रसिद्ध होईल. ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ठाणे येथील डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे लॉटरी काढली जाणार आहे.
लॉटरी पाच घटकांत
२०% सर्वसमावेशक योजना - ५६५ घरे
१५ टक्के एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेअंतर्गत - ३००२ घरे
कोकण मंडळ गृहनिर्माण योजना व विखुरलेल्या सदनिका आहे त्या स्थितीमध्ये योजनेअंतर्गत - १६७७ घरे
कोकण मंडळ गृहनिर्माण योजनेअंतर्गत (५०% परवडणाऱ्या सदनिका) - ४१ घरे
मुदतवाढ नाही
कोकण मंडळाच्या लॉटरीला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच यासाठी अर्ज करण्याच्या प्रक्रियेला १५ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे, अशा आशायाची माहिती समोर आली.
मात्र यासंदर्भात कोकण मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांना विचारले असता अद्याप तरी मुदतवाढ दिलेली नाही, असे सांगितले.