Join us

म्हाडाची घरांची लॉटरी आता ८ ऑक्टोबरला; बहुसंख्य अर्जदारांचे लक्ष किंमत कमी झालेल्या घरांकडे 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 06:39 IST

३७० घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

मुंबई - म्हाडाच्या २ हजार ३० घरांच्या लॉटरीसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत असून, रात्री ११:५९ पर्यंत ऑनलाइन अनामत रकमेचा भरणा करता येणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता नरिमन पॉइंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे लॉटरी काढली जाणार आहे.

३७० घरांच्या किमती १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी झाल्याने अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला ९ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला. १९ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेत आरटीजीएस / एनईएफटीद्वारे अनामत रकमेचा भरणा करण्याची मुदत आहे. 

२९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ पर्यंत प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यापासून ऑनलाइन दावे, हरकती दाखल करण्याची अंतिम मुदत आहे.  ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता लॉटरीसाठी स्वीकृत अर्जाची अंतिम यादी म्हाडाच्या https://housing. mhada. gov.in या वेबसाइडवर सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध होईल. लॉटरी झाल्यानंतर सोडतीमधील यशस्वी व प्रतीक्षा यादीवरील अर्जदारांची नावे म्हाडाच्या वेबसाइडवर प्रसिद्ध केली जातील. 

२७ सप्टेंबर रोजी लॉटरीसाठी प्राप्त अर्जांची प्रारूप यादी म्हाडाच्या https://housing. mhada.gov.in या संकेतस्थळावर सायंकाळी ६:०० वाजता प्रसिद्ध होईल.

टॅग्स :म्हाडा