लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : म्हाडाने २०२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील घरांसाठी ‘प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य’ या तत्त्वावर काढलेल्या लॉटरीतील शिरढोण व खोणी येथील ६ हजार २४८ घरांची विक्री किंमत कमी करण्यात आली आहे. दोन्ही ठिकाणावरील घरांच्या किमती एक ते दीड लाखाने कमी केल्या आहेत. म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शिरढोण येथील घरांच्या सुधारित विक्री किंमत प्रस्तावास मान्यता दिली आहे.
सुधारित किंमत १९ लाख ११ हजार
त्यानुसार कोकण मंडळाच्या ऑक्टोबर २०२४ मधील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेतील ठाणे जिल्ह्यातील शिरढोण येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ५,२३६ घरांची किंमत प्रती सदनिका १ लाख ४३ हजार ४०४ रुपयांनी कमी केली. सुधारित किंमत आता १९ लाख २८ हजार ७४२ रुपये आहे. ऑक्टोबर २०२४ मधील खोणी येथील अत्यल्प उत्पन्न गटातील १०१२ घरांची किंमत प्रति सदनिका १ लाख १ हजार ८०० रुपयांनी कमी केली. घराची सुधारित किंमत आता १९ लाख ११ हजार ७०० रुपये आहे.
आता प्रतिसाद वाढेल का?
कोकण मंडळाच्या लॉटरीमधील घरांच्या किमती जास्त आहेत. विजेत्यांना घराचा ताबा, सेवा-सुविधा मिळायला विलंब होतो. त्यामुळे या घरांना अत्यंत कमी प्रतिसाद मिळत आहे. आता किमती कमी केल्यानंतर आता लॉटरीला कितपत प्रतिसाद लाभतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.