म्हाडाचा दक्षता विभाग कागदावरच !
By Admin | Updated: July 7, 2014 02:05 IST2014-07-07T02:05:04+5:302014-07-07T02:05:04+5:30
ष्टाचाराचे कुरण बनलेल्या म्हाडामध्ये गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंधासाठी कार्यान्वित असलेल्या दक्षता विभागाचे अस्तित्व केवळ कागदावर आणि ‘मलई’ मिळविण्यासाठी असल्याची परिस्थिती आहे

म्हाडाचा दक्षता विभाग कागदावरच !
जमीर काझी, मुंबई
भ्रष्टाचाराचे कुरण बनलेल्या म्हाडामध्ये गैरव्यवहार व बेकायदेशीर कृत्याला प्रतिबंधासाठी कार्यान्वित असलेल्या दक्षता विभागाचे अस्तित्व केवळ कागदावर आणि ‘मलई’ मिळविण्यासाठी असल्याची परिस्थिती आहे. विभागाचे प्रमुख मुख्य दक्षता अधिकाऱ्याचे पद ७ महिन्यांपासून रिक्त आहे. अन्य विभागांच्या अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कारभार देऊन दररोजचा दिवस ढकलला जात आहे. डिसेंबरमध्ये रामराव पवार निवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी दुसऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली नाही.
म्हाडामध्ये दलालांचा सुळसुळाट सुरू असताना त्याला अटकाव करणे तर दूरच राहिले आहे; आणि अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या गैरव्यवहाराची प्रकरणे, शिवाय बेकायदेशीर प्रकरणांबाबत आलेल्या तक्रारी तशाच प्रलंबित राहिलेल्या आहेत. विभागातील अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कारवाईपेक्षा त्यातून ‘मलई’ मिळविणावर भर दिल्याची चर्चा परिसरात उघडपणे सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहाथ पकडलेले मिळकत विभागाचे व्यवस्थापक रामकृष्ण आत्राम यांच्याविरुद्ध विभागाकडे अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र विभागाकडून त्याबाबत साधी चौकशी करण्यात आली नसल्याचे म्हाडातील सूत्रांकडून सांगण्यात आले.
गरजू नागरिकांना रास्त दरात हक्काचा निवारा मिळवून देणे, या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची (म्हाडा) व्याप्ती राज्यभर आहे. मानवाच्या मूलभूत गरजांपैकी एक निकड असलेल्या वास्तूच्या पूर्ततेसाठी कार्यरत राहणाऱ्या म्हाडामध्ये गेल्या काही वर्षांत भ्रष्टाचाराचा सुळसुळाट झाला
आहे.
गरजू नागरिकांना घर मिळवून देणे तसेच जुन्या इमारतीच्या पुनर्विकास योजनेदरम्यान संक्रमण शिबिरात नंबर लावण्याच्या आमिषाने दलालांनी लुबाडणूक केली आहे. त्याला म्हाडातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांशी हातमिळवणी करून ‘रॅकेट’ कार्यरत असल्याचे अनेक प्रकरणांतून चव्हाट्यावर आले.