Join us

मेट्रो, भरधाव वाहने जातील खालून, तुम्ही रस्ता ओलांडा वरून

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2023 10:21 IST

पश्चिम द्रुतगती महामार्ग सुरक्षित ओलांडण्यासाठी नवीन पादचारी पूल खुला झाला

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी दिंडोशी आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकालगत पादचारी पुलाचे लोकार्पण केले. हा पूल मेट्रो प्रवासी, पादचारी आणि स्थानिक नागरिकांना पश्चिम द्रुतगती महामार्ग सुरक्षितपणे ओलांडण्यास मदत करेल. तसेच यामुळे अपघातांना आळा बसेल. यावेळी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त गोविंद राज, सह महानगर आयुक्त एस. राममूर्ती उपस्थित होते. 

मल्टी-मॉडल इंटिग्रेशन योजनेचा उद्देश हा मुख्यत्वे मेट्रो स्थानकांपासून सुलभता, सुरक्षितता आणि अंतिम स्थानकापर्यंत वाहतुकीवर लक्ष केंद्रित करणे हा आहे. त्यामुळे पादचारी पूल हे मल्टी-मॉडल इंटिग्रेशनचे महत्त्वाचे घटक आहेत. पादचारी पूल हे केवळ मेट्रो प्रवाशांसाठीच नव्हे, तर इतर पादचाऱ्यांनाही सुरक्षित रस्ता ओलांडण्यासाठी फायदेशीर ठरतील.

- एस. व्ही. आर. श्रीनिवास, महानगर आयुक्त, एमएमआरडीए

दिंडोशी मेट्रो स्थानकालगत ११२ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद पादचारी पूल आणि राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्थानकालगत ८३ मीटर लांब आणि ४ मीटर रुंद पादचारी पूल या दोन्ही स्थानकांच्या उत्तरेकडून पूर्व-पश्चिम जोडणी प्रदान करतात.

राष्ट्रीय उद्यानालगतचा पादचारी पूल नॅशनल पार्कचा  परिसर, अशोक व्हॅन, काजूपाडा, पार्क कॉम्प्लेक्स, बोरीवली पूर्व आणि कुलुपवाडी येथील रहिवाशांना लाभदायक ठरेल.

३) दिंडोशी उड्डाणपूल कोकणीपाडा, मालाड पूर्व, गोकुळधाम, फिल्मसिटी आणि पठाणवाडी या भागातील पादचारी आणि नागरिकांना फायदेशीर ठरेल.

टॅग्स :मुंबई