मुंबई : मुंबईकरांना मेट्रोचे तिकीट काढणे आणखी सोपे झाले आहे. आता अंधेरी पश्चिम ते दहिसर मेट्रो ‘२ अ’ आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो ७ मार्गिकेचे तिकीट विविध १४ ॲपद्वारे बुक करता येणार आहेत. त्यामुळे मेट्रोचे तिकीट काढण्याचा वेळ वाचणार आहे.
महामुंबई मेट्रो संचलन मंडळाकडून (एमएमएमओसीएल) डिजिटल आणि पर्यावरणपूरक प्रवासाला चालना दिली जात आहे. त्याचाच भाग म्हणून या दोन्ही मेट्रो मार्गिकांच्या तिकीट बुकिंगसाठी ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स (ओएनडीसी) नेटवर्कवर एकत्रीकरण करण्यात आले आहे.
त्याचे नुकतेच अनावरण करण्यात आले. त्यामुळे आता प्रवासी वाहतूक क्षेत्रातील विविध खासगी कंपन्यांसह ऑनलाइन सेवा पुरवठादार प्लॅटफॉर्मवरूनही प्रवाशांना मेट्रोची तिकिटे काढता येणार आहेत.
प्रवाशांना ‘वन तिकीट’, ‘इज माय ट्रीप’, ‘कन्फर्म तिकीट’, ‘यात्री रेल्वे’, ‘व्होडाफोन आयडिया’, ‘रेड रेल’ अशा १४ ॲपवर क्यूआर आधारित
तिकिटे मिळू शकणार आहेत, तसेच भविष्यात आणखी काही ॲपवरही तिकिटाची सुविधा दिली जाणार आहे, अशी माहिती ‘एमएमएमओसीएल’च्या अधिकाऱ्यांनी दिली.
रांगेत उभे राहणे टळणार
‘एमएमआरडीए’ने दोन महिन्यांपूर्वी मुंबई वन ॲपचे अनावरण केले होते. दोन महिन्यांतच या ॲपच्या वापरकर्त्यांची संख्या ३,७८,७९२ पर्यंत पोहोचली आहे.
त्यामुळे कागदी तिकिटांचा वापर मोठ्या प्रमाणात घटला आहे, तसेच प्रवाशांना तिकिटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज भासत नाही.
फायदे काय होणार?
प्रवाशांना सहजरीत्या कोणत्याही ॲपवरून तिकीट काढता येणार आहे.
तिकिटासाठी रांगेत थांबण्याची आता गरज नाही.
कागदी तिकिटांचा वापर घटणार आहे.
पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळणार आहे.
सद्य:स्थितीत मेट्रो ‘२ अ’ आणि ७ मार्गिकेवरून दररोज साधारणपणे साडेतीन लाख प्रवासी प्रवास करत आहेत. दहीसर ते मीरा-भाईंदर मेट्रो ९ आणि मंडाळे ते डी. एन. नगर मेट्रो ‘२ बी’ या मार्गिकांचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकांवरील प्रवाशांनाही या १४ ॲपद्वारे तिकीट काढता येणार आहे.
Web Summary : Mumbai Metro riders can now book tickets for lines 2A and 7 via 14 apps, saving time and promoting digital travel. This initiative, integrated with the ONDC network, allows passengers to purchase QR-based tickets easily, reducing queues and paper usage.
Web Summary : मुंबई मेट्रो में यात्री अब लाइन 2ए और 7 के लिए 14 ऐप्स के माध्यम से टिकट बुक कर सकते हैं, जिससे समय की बचत होगी और डिजिटल यात्रा को बढ़ावा मिलेगा। ओएनडीसी नेटवर्क के साथ एकीकृत यह पहल यात्रियों को आसानी से क्यूआर-आधारित टिकट खरीदने, कतारों और कागज के उपयोग को कम करने की अनुमति देती है।