मेट्रोचा वेग वाढणार?
By Admin | Updated: September 26, 2014 01:51 IST2014-09-26T01:51:07+5:302014-09-26T01:51:07+5:30
प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोचा वेग वाढवण्याचा विचार केला जात आहे. तसे झाल्यास मेट्रोचा प्रवास थोडा आणखी जलद होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे

मेट्रोचा वेग वाढणार?
मुंबई : प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रोचा वेग वाढवण्याचा विचार केला जात आहे. तसे झाल्यास मेट्रोचा प्रवास थोडा आणखी जलद होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. सध्या मेट्रो ताशी ५0 किमी वेगाने धावते.
११.४0 किलोमीटर लांबीचा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रकल्प ८ जून रोजी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. तत्पूर्वी आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन) या वेगाची चाचणी करण्यात आली होती. मेट्रोची चाचणी घेताना ती ताशी ८0 किलोमीटर वेगाची घेण्यात आली. मात्र त्याला अखेरची परवानगी ताशी ५0 किलोमीटर वेगाची देण्यात आली. मेट्रोच्या रुळावर पडणारा ताण किती आहे, म्हणून एक यंत्रणा बसवण्यात आली. यात एकाच डब्यावर पडणारा प्रवाशांचा ताण आणि इतर तांत्रिक बाबींचा समावेश होता. या सर्व गोष्टींची माहिती घेऊन ती रेल्वे बोर्डाला सादर केल्यानंतरच वेग वाढवण्याची परवानगी मिळेल, असे त्या वेळी पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून नमूद केले होते.
सध्याच्या असलेल्या वेगामुळे मेट्रोला वर्सोवा ते घाटकोपर पोहोचण्यास साधारण २५ मिनिटे ते अर्धा तास लागत आहे. वेग वाढल्यास हाच वेळ आणखी कमी होऊ शकतो आणि प्रवाशांचा प्रवास जलद होऊ शकतो, असा अंदाज मेट्रो प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासन ताशी ८0 किलोमीटर वेग वाढवण्यासंदर्भात विचार करत असल्याचे सांगितले. (प्रतिनिधी)