मेट्रो ताशी 80 कि़मी़ वेगाने?
By Admin | Updated: November 27, 2014 02:15 IST2014-11-27T02:15:13+5:302014-11-27T02:15:13+5:30
अल्पावधीतच पसंतीस उतरलेल्या मेट्रोने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या असतानाच आता याच मेट्रोचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

मेट्रो ताशी 80 कि़मी़ वेगाने?
मुंबई : अल्पावधीतच पसंतीस उतरलेल्या मेट्रोने प्रवाशांसाठी अनेक सुविधा उपलब्ध केलेल्या असतानाच आता याच मेट्रोचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मेट्रो आणखी जलद धावण्यासाठी ताशी 80 किलोमीटर वेगाचा प्रस्ताव मेट्रो प्रशासनाने तयार केला असून, तो रेल्वे सुरक्षा आयुक्तांना सादर केला आहे. त्यावर काही प्रश्न उपस्थित करीत एक पत्र मेट्रोला आठवडय़ापूर्वीच पाठवल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले.
4 हजार 321 कोटी रुपयांचा आणि 11.40 किलोमीटर लांबीचा वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो प्रकल्प 8 जून 2014 रोजी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला. तत्पूर्वी आरडीएसओकडून (रिसर्च डिझाइन अॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायङोशन) या मेट्रोच्या वेगाची चाचणी केली होती. मेट्रोची चाचणी घेताना ती ताशी 80 किलोमीटर वेगाची घेतली. मात्र त्याला अखेरची परवानगी ताशी 50 किलोमीटर वेगाची दिली. मेट्रोच्या रुळावर पडणारा ताण किती आहे, हे बघण्यासाठी एक यंत्रणा बसवली असून, त्याची माहिती घेण्याचे पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी सागितले होते. यात एकाच डब्यावर पडणारा प्रवाशांचा ताण आणि इतर तांत्रिक बाबींचा समावेश होता. या सर्व गोष्टींची माहिती घेऊन ती रेल्वे बोर्डाला सादर केल्यानंतरच वेग वाढवण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी घेतला होता. आता मेट्रो प्रशासनाने मेट्रोचा वेग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रस्ताव तयार केला असून, तो नुकताच रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडे पाठवला होता. त्यानंतर बक्षी यांनी मेट्रोच्या वेगाची परवानगी देताना कुठल्या अटी होत्या, मेट्रोची देखभाल आणि दुरुस्ती कशी केली जाते आणि अन्य तांत्रिक प्रश्न उपस्थित केले असून, त्याबाबतचे उत्तर मेट्रो प्रशासनाकडे मागितले आहे. याबाबत बक्षी यांनी सांगितले की, ताशी 80 किलोमीटर वेग वाढवण्याच प्रस्ताव आलेला आहे. त्यानंतर काही तांत्रिक प्रश्न उपस्थित करीत त्याबाबतचे एक पत्र आठवडय़ापूर्वीच मेट्रोला प्रशासनाला पाठवले आहे.
सध्याच्या असलेल्या वेगामुळे मेट्रोला वर्सोवा ते घाटकोपर पोहोचण्यास साधारण 25 मिनिटे ते अर्धा तास लागत आहे.
वेग वाढल्यास हाच वेळ आणखी कमी होऊ शकतो आणि प्रवाशांचा प्रवास जलद होऊ शकतो, असा अंदाज मेट्रो प्रशासनाकडून वर्तविण्यात येत आहे.
मेट्रोचा वेग वाढणार? असे वृत्त 26 सप्टेंबरच्या ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते. रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी दिलेल्या माहितीमुळे ‘लोकमत’चे वृत्त खरे ठरले आहे.