Join us  

मेट्रोला खासगी सुरक्षेचे कवच 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 02, 2020 6:43 PM

३० स्टेशन आणि कारडेपोच्या सुरक्षेसाठी रोज २.७५ लाखांचा खर्च  

 

मुंबई :  अंधेरी ते दहिसर ( मेट्रो ७) आणि दहिसर ते डी. एन. नगर (मेट्रो २ अ) या दोन मेट्रो मार्गिकांच्या स्वच्छतेसाठी खासगी कंत्राटदार नेमण्याचा निर्णयापाठोपाठ या मार्गावरील सुरक्षा व्यवस्थेसाठीसुध्दा खासगी एजन्सीची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गांवरील ३० स्टेशन आणि एका कारडेपोच्या सुरक्षेससाठी दररोज सुमारे २ लाख ७५ हजार रुपये खर्च होतील असा अंदाज आहे. सुरक्षारक्षकांच्या फौजेसह इथे ३० श्वानांचे पथकही तैनात असेल.

लाँकडाऊनमुळे मेट्रोच्या कामांची गती संथ झाली असली तरी मे, २०२१ पर्यंत या दोन्ही मार्गावरील प्रवासी सेवा सुरू करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. त्यानुसार या मार्गिकांच्या संचलनासाठी आवश्यक नियोजन सुरू करण्यात आले आहे. या मार्गांवरील सुरक्षा व्यवस्थेसाठी एमएमआरडीएने निविदा प्रसिध्द केल्या आहेत. तीन वर्षांसाठी साधारणतः ३० कोटी ९८ लाख रुपये सुरक्षा व्यवस्थेवर खर्च करावे लागतील असे अंदाजपत्रक त्यासाठी तयार करण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएच्या अधिका-यांनी दिली.

निवृत्त लष्करी अधिकारी, होमगार्ड यांना किंवा किमान दोन वर्षे सुरक्षा रक्षकाचे काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जणार आहे. त्यासाठी एमएमआरडीएने शारीरिक निकषही निश्चित केले आहेत. ३० रेल्वे स्टेशनच्या सुरक्षेसाठी ९ पर्यवेक्षक आणि १६३ गार्ड नेमले जातील. त्याशिवाय ३० श्वान, त्यांचे ३० हँण्डलर्स आणि ४ पर्यवेक्षकांची नियुक्ती कंत्राटदाराला करावी लागेल. श्वानांच्या वास्तव्यासाठी एमएमआरडीए जागा उपलब्ध करून देणार आहे. १३४ गार्ड आणि ६ सुपरवायझऱ कायम सुरक्षेसाठी तैनात ठेवावे लागतील. सकाळी ५ ते रात्री १२ या त्यांच्या कामाच्या वेळा असतील. प्रत्येकाला दररोज साडे नऊ तास काम आणि आठवड्यातून दोन सुट्ट्या दिल्या जातील. तसेच, प्रत्येक स्टेशनवर एक महिला गार्डही तैनात असेल. चारकोप डेपोच्या सुरक्षेची जबाबदारी २९ गार्ड आणि ३ पर्यपेक्षकांवर असेल.   

 

प्रवाशांशी गैरवर्तणूक ; दोन हजारांचा दंड

या मेट्रो मार्गिकांवरील सर्व प्रकारच्या मालमत्तेचे आणि साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी या एजन्सीची असेल. कामादरम्यान अत्यावश्यक कारणाशिवाय मोबाईल वापरण्यास बंदी असेल. प्रवाशांशी गैरवर्तणूक केल्यास दोन हजार रुपये दंडाची तरतूद आहे. तर, सुरक्षारक्षकांची गैरहजेरी, कमी संख्या, निर्धारित क्षमतेपेक्षा कमी श्वान अशा विविध त्रृटी आढळल्या तर त्यासाठीसुध्दा दंड निश्चित करण्यात आल्याची माहिती अधिका-यांनी दिली.   

 

टॅग्स :मेट्रोमुंबई