Join us  

मुख्यमंत्र्यांना आरेबद्दल खोटं बोलायला लावलं जातंय; आदित्य ठाकरेंचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2019 7:16 PM

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आरेचा मुद्दा तापला

अंबरनाथ : आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्हं आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंनी कारशेडवरुन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला लक्ष्य केलं आहे. मेट्रोचे अधिकारी खोटी माहिती देऊन मुख्यमंत्र्यांना खोटं बोलायला लावत असल्याचा आरोप त्यांनी केला. अंबरनाथमध्ये जन आशीर्वाद यात्रेदरम्यान आदित्य यांनी मेट्रो कारशेडच्या मुद्द्यावर भाष्य केलं. आदित्य ठाकरे यांनी कल्याण लोकसभा मतदार संघातील जन आशीर्वाद यात्रेला अंबरनाथमधून सुरुवात झाली. सकाळी 11 वाजता फॉरेस्ट नाका येथून यात्रेला सुरुवात झाली. यात्रेच्या मार्गावर नागरिक आणि कार्यकर्त्यांची भेट घेत ते शिवाजी चौकात आले. या ठिकाणी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्यानंतर आरे येथील कारशेड उभारणीसाठी होणाऱ्या वृक्षतोडीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर ठाकरे यांनी एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांवर आरोप केला. हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असल्याचं आदित्य म्हणाले. आदित्य यांनी नाणार रिफायनरी प्रकल्पावरही भाष्य केलं. आम्ही भूमीपुत्रांच्या बाजूने आहोत. मात्र त्याचा अर्थ आम्हाला विकास नकोय असा नाही. पर्यावरणाची हानी करुन कोणताच विकास नको. जिथे भूमीपुत्रांचा विरोध असेल तर तिथे आमचाही विरोध असेल, असं आदित्य यांनी म्हटलं. महाराष्ट्र बेरोजगारमुक्त आणि दुष्काळमुक्त करण्याचा असल्याचंदेखील त्यांनी सांगितलं. सध्या सुरू असलेल्या पक्षांतरांऐवजी नागरिकांच्या प्रश्नांवर विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. नेत्यांच्या राजकीय भवितव्याबद्दल चर्चा करण्याऐवजी प्रश्नांवर चर्चा करायला हवी. नाही तर जनता आम्हाला वेडं समजेल, असा टोला त्यांनी लगावला. कोणत्या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार यावर माझी कर्मभूमी महाराष्ट्र असल्याचं ते म्हणाले. लोकांचा आशीर्वाद घेऊन या संदर्भात निर्णय घेणार असल्याचं त्यांनी पुढे म्हटलं. 

 

टॅग्स :मेट्रोआदित्य ठाकरेदेवेंद्र फडणवीसआरेशिवसेना