मेट्रोचाही आता जम्बो ब्लॉक; रविवारी सेवा साडेसात तास बंद!
By Admin | Updated: July 4, 2015 03:20 IST2015-07-04T03:20:50+5:302015-07-04T03:20:50+5:30
आत्तापर्यंत केवळ रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येत असे, पण आता मेट्रोदेखील जम्बो ब्लॉक घेणार आहे. येत्या रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर

मेट्रोचाही आता जम्बो ब्लॉक; रविवारी सेवा साडेसात तास बंद!
मुंबई: आत्तापर्यंत केवळ रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक घेण्यात येत असे, पण आता मेट्रोदेखील जम्बो ब्लॉक घेणार आहे. येत्या रविवारी सकाळी ८.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या मेट्रो मार्गावर मेट्रोची सुरक्षा चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे या साडेसात तासांच्या कालावधीत मेट्रो रेल्वेची सेवा पूर्णत: बंद राहणार आहे.
मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तालयाच्या निर्देशानुसार मेट्रोच्या ११.४ किलोमीटर मार्गावर सुरक्षेसाठीची चाचणी घेण्यात येणार आहे. सद्य:स्थितीमध्ये ५० प्रतिकिमी एवढ्या वेगाने धावणारी मेट्रो भविष्यात ८० प्रतिकिमी वेगाने धावावी; यासाठी सुरक्षा चाचणीचा फायदा होणार आहे. सुरक्षा चाचणीदरम्यान मेट्रोच्या वेगाचा तपशील घेण्यात येणार असून, आयुक्तालयाकडून मेट्रोच्या वेगाची तपासणी केली जाणार आहे. मेट्रो प्रवाशांच्या सुरक्षेसह सेवेचा दर्जा वाढावा, म्हणून या चाचण्या घेण्यात येणार असल्याने प्रवाशांनी सहकार्य करावे, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे. दरम्यान, मेट्रोने यापूर्वी डागडुजीसाठी पहिला मेगाब्लॉक २४ ते २६ जानेवारी असा तीन दिवस पहिल्या दोन तासांसाठी घेतला होता. त्यानंतर काही महिन्यांतच घेण्यात आलेला दुसरा मेगाब्लॉकदेखील दोन ते तीन तासांसाठी होता. आता म्हणजे येत्या रविवारी घेण्यात येणार जम्बो ब्लॉक साडेसात तासांचा आहे. (प्रतिनिधी)