Join us

मेट्रोने मिळवले दोन कोटी प्रवासी, फेज २ सुरू झाल्यानंतर या संख्येत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2023 13:20 IST

आतापर्यंत ८१ हजारांहून अधिक मुंबईकरांनी घेतला लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : मुंबईच्यामेट्रोने प्रवासी संख्येमध्ये एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. आतापर्यंत मेट्रो ७ आणि २ अ वरून २ कोटी प्रवाशांनी प्रवास केला आहे. मेट्रो फेज १ सुरु झाल्यानंतर दिवसाला सरासरी ३०,५०० प्रवासी प्रवास करत होते; ज्यामध्ये १७२ फेऱ्यांचा समावेश होता. याचबरोबर फेज २ सुरू झाल्यानंतर या संख्येत वाढ होऊन २४५ मेट्रो फेऱ्यांनी दिवसाला सरासरी १.६ लाखाहून जास्त प्रवासी मेट्रोने प्रवास करू लागले.

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी सांगितले की, मुंबई मेट्रोने वर्षभरात २ कोटी प्रवासी संख्या पार करणे ही एक खूप मोठी कामगिरी आहे. आम्ही प्रवाशांना नेहमीच अत्याधुनिक प्रवास सुविधा, सेवा प्रदान करण्यासाठी प्रयत्नशील आहोत. यासोबतच लास्ट माईला कनेक्टिव्हिटी कशी प्रदान करता येईल याकडे देखील लक्ष आहे. त्याचबरोबर मुंबईकरांचा प्रवास आणखी सोपा व्हावा यासाठी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मुंबई-१ नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड आणले आहे; ज्याचा लाभ आतापर्यंत ८१ हजार हून अधिक मुंबईकरांनी घेतला आहे.

मेट्रो फेज १ सुरु झाल्यानंतर

  • फेऱ्या- १७२
  • दिवसाला सरासरी प्रवासी- ३०,५००

मेट्रो फेज २ सुरु झाल्यानंतर

  • फेऱ्या- २४५
  • दिवसाला सरासरी प्रवासी- १,६०,००० +
टॅग्स :मुंबईमेट्रो