मेट्रोने ओलांडला ४० कोटी प्रवाशांचा पल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2018 04:07 IST2018-05-02T04:07:28+5:302018-05-02T04:07:28+5:30
अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे.

मेट्रोने ओलांडला ४० कोटी प्रवाशांचा पल्ला
मुंबई : अंधेरी ते पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रो मार्गावर गतवर्षीच्या तुलनेत ७८ हजार ७९० प्रवासी वाढले आहेत. यामुळे हा मेट्रो टप्पा सर्वाधिक वर्दळीचा ठरला आहे. मुंबई मेट्रो सुरू झाल्यापासून मार्चपर्यंत म्हणजेच १ हजार ४२३व्या दिवशी तब्बल ४० कोटींचा प्रवासी टप्पा पार केला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा मेट्रो प्रवाशांमध्ये १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. अंधेरी-पश्चिम द्रुतगती महामार्ग या मेट्रोच्या मार्गावरून मार्च २०१७मध्ये १ लाख ६३ हजार ७८३ प्रवाशांनी प्रवास केला. यंदा यात ४८ टक्के वाढ झाली. परिणामी, मार्च २०१८मध्ये तब्बल २ लाख ४२ हजार ५८३ पर्यंत प्रवासी आकडा पोहोचला. घाटकोपर ते चकाला मेट्रो मार्गादरम्यान प्रवासी संख्येत सर्वाधिक कमी अर्थात १३ टक्के वाढ झालेली आहे. या मार्गादरम्यान मार्च २०१७मध्ये ४ लाख ९६ हजार ४४७ प्रवाशांनी तर मार्च २०१८मध्ये ५ लाख ६० हजार ३८१ प्रवाशांनी प्रवास केला.
२०१७ ते मार्च २०१८ या कालावधीत मेट्रोने १ लाख २५ हजार ८९४ फेऱ्या पूर्ण केल्या. मेट्रो गर्दीच्या वेळेत सुमारे एका फेरीमध्ये सुमारे २९ हजार प्रवाशांची वाहतूक करते. मुंबई मेट्रोने पहिल्या १० कोटी प्रवाशांचा टप्पा ३९८ दिवसांत पूर्ण केला होता. तर त्यापुढील १० कोटींसाठी ३८८ दिवस आणि तिसºया १० कोटींसाठी ३३७ आणि चौथ्या १० कोटी प्रवाशांसाठी ३०० दिवस लागल्याची माहिती मुंबई मेट्रोने दिली.
मार्ग मार्च १८ मार्च १७ वाढ
अंधेरी-पश्चिम द्रुतगती मार्ग २.४२ १.६३ ०.७८
अंधेरी-आझाद नगर २.०४ १.४० ०.६३
अंधेरी-डी. एन. नगर २.४३ २.०० ०.४२
अंधेरी-साकीनाका १०.६० ८.८३ १.७६
अंधेरी- एअरपोर्ट रोड १.९८ १.६७ ०.३१
अंधेरी-वर्सोवा २.८३ २.४१ ०.४१
अंधेरी-असल्फा ३.७१ ३.१७ ०.५४
अंधेरी-मरोळ नाका ६.८५ ५.९९ ०.८६
घाटकोपर-अंधेरी १०.४९ ९.२९ १.१९
घाटकोपर-चकाला ५.६० ४.९६ ०.६३