Join us  

‘मेट्रो-२ ए, मेट्रो-७’ वेळेतच पूर्ण होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2020 12:37 AM

एमएमआरडीएचा दावा : कारशेडचे कामही अंतिम टप्प्यात, २०२० पर्यंत धावणार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : दहिसर (पूर्व) ते अंधेरी (पूर्व) या मेट्रो-७ मार्गिकेवरील एका कंत्राटदारास कामातील दिरंगाईबद्दल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीएने) काढून टाकले आहे, तर डी. एन. नगर ते मंडाले या मेट्रो-२ बी मार्गिका आणि मंडाले येथील कारडेपोचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचेही कंत्राट रद्द केले आहे. या दोन्ही मार्गिकांवर डिसेंबर, २०२० पर्यंत मेट्रो धावेल, असे एमएमआरडीएने जाहीर केले होते. कंत्राटदारावर कारवाई झाल्याने हे दोन्ही मेट्रो मार्ग वेळेमध्ये कार्यान्वित होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. मात्र, हे दोन्ही प्रकल्प ठरल्या वेळेतच सुरू होतील, असे एमएमआरडीएच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या मार्गिकांसाठीचे चारकोप येथील कारशेडचे कामही आता अंतिम टप्प्यामध्ये आल्याने मेट्रोचे काम न थांबता सुरू राहील, असा दावा एमएमआरडीएच्या वतीने करण्यात आला आहे.याच मार्गिकेवरील ५.९ किमी मार्गासाठी मे. एमबीझेड-आरसीसी या कंपनीस ५२१.२१ कोटी रुपयांचे कंत्राट एप्रिल, २०१८ मध्ये देण्यात आले होते. या कामापैकी ६० टक्के काम तीस महिन्यांत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, २१ महिन्यांनतरही केवळ ४.४८ टक्केच काम पूर्ण झाले, तर डेपोच्या बांधकामासाठी एमबीझेड-आरसीसी कंपनीस ३९०.४४ कोटी रुपयांचे कंत्राट जानेवारी, २०१८ मध्ये देण्यात आले होते. त्यानंतरच्या ३६ महिन्यांत ५० टक्के काम अपेक्षित होते. मात्र, केवळ ६.९८ टक्केच काम २५ महिन्यांत पूर्ण झाले. यामुळे या कंपनीवर कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे मेट्रो-२ बी, मेट्रो-७ मार्गिकेचे काम रखडेल, असे म्हटले जात होते.मात्र, या उर्वरित कामासाठी लवकरच निविदा प्रक्रिया राबवून काम सुरू केले जाईल. यामुळे या मार्गिकेचे काम रखडणार नसल्याचे एमएमआरडीएकडून स्पष्ट करण्यात येत आहे, तसेच मेट्रो-२ ए, मेट्रो-बी आणि मेट्रो मार्गिकेसाठी मेट्रो डबे येण्यास जुलैपासून सुरुवात होणार आहे.काम करण्यात कोणतीही अडचण नाहीया दोन्ही मार्गिकांच्या कारशेडचेही काम रखडल्याने आणखी विलंब होईल, असे म्हटले जात होते. मात्र, चारकोप येथे या येणाºया मेट्रोच्या डब्यांसाठी खास सोय केलेली असून, येथे पर्याप्त जागा असल्याचे एमएमआरडीएमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे, तसेच या कारशेडचे कामही अंतिम टप्प्यामध्ये आले असल्याने काहीही अडचण येणार नसल्याचे एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.मेट्रो २ ए, मेट्रो२ बी आणि मेट्रो-७ या मार्गावरील मेट्रो कोचसाठी भारत अर्थ मुव्हर्स लिमिटेड (बीईएमएल) यांना कंत्राट देण्यात आले आहे. मेक इन इंडियाअंतर्गत हे काम होणार आहे. ३,८१६ कोटी रुपयांचे हे कंत्राट असून, ५०५ मेट्रो कोचची निर्मिती होत आहे. सहा कोचची पहिली प्रोटोटाइप मेट्रो जुलै, २०२० पर्यंत उपलब्ध होणार आहे. त्यानंतर, या मेट्रो मार्गावर चाचणी सुरू होईल. त्यानंतर, टप्प्याटप्प्याने मेट्रो मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. मात्र, या मेट्रो ठेवण्यासाठी कारशेडमध्ये पुरेशी जागा उपलब्ध असल्याचेही एमएमआरडीएने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :मेट्रोएमएमआरडीए