Join us

संत साहित्याच्या अभ्यासाची पद्धत बदलायला हवी - सदानंद मोरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2020 04:31 IST

Sadanand More :

मुंबई : अभ्यासक्रमात विशेषतः एमए, बीएला पाच-पन्नास मार्कांसाठी काही ओव्यांचा समावेश आहे, पण आता संत साहित्याचा अभ्यास करण्याची ही पद्धत आपण बदलायला हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे. संत साहित्य मानवाच्या जीवनाचे साहित्य असल्याचेही मोरे म्हणाले.वारकरी साहित्य परिषदेच्या ९व्या मराठी संत साहित्य संमेलनाला सोमवारी जुहू येथील नोव्हेटेल हाॅटेलमध्ये सुरूवात झाली. उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बिहारचे माजी राज्यपाल डी.वाय.पाटील, यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष, पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ह.भ.प. चकोर बाविस्कर, ह.भ.प. विठ्ठल पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी मोरे म्हणाले की, एमए, बीएच्या अभ्यासक्रमात संतांच्या अभंगांच्या काही ओव्यांचा समावेश आहे. संत साहित्याच्या अभ्यासाची ही पद्धत बदलावी लागणार आहे. १८६९ साली मुंबई विद्यापीठाचा एक इंग्रज कुलगुरू तुकारामांना महाराष्ट्राचा राष्ट्रकवी संबोधतो. गाथा अभ्यासली जावी, म्हणून प्रयत्न करतो. ते छापण्यासाठी ब्रिटिश सरकार २४ हजारांचे अनुदान देते, तर दुसरीकडे १९८० साली महाराष्ट्रात संतपीठ तयार करण्याची घोषणा झाली. नाडकर्णी समितीच्या शिफारशीनंतर अनेकदा संतपीठाबाबत घोषणा झाल्या. मध्यंतरी ते पैठणला बनवायचा निर्णय घेत, एक इमारत उभारली, पण त्याचे कार्यान्वयन अजून झाले नसल्याचे सदानंद मोरे म्हणाले.उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी संतपीठाचे काम आपल्याच कार्यकाळात मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. वारकऱ्यांना विश्वासात घेऊन संत चरित्राची निर्मिती अभ्यास मंडळाच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगतानाच, पुढच्या वर्षी रत्नागिरीत वारकरी साहित्य संमेलन भरविण्याचे आवाहनही त्यांनी आयोजकांना केले, तर संमेलनाचे अध्यक्ष चकोर महाराज बाविस्कर यांनी संत साहित्य केवळ प्रस्थापितांवर प्रहार करण्यासाठी नव्हे, तर बुडणाऱ्यांच्या कळवळ्यातून, आर्तांची साकळी तोडण्यासाठी तयार झाले. प्रत्येक व्यक्तीच्या उक्ती आणि कृतीला संत साहित्य आधार ठरू शकतो. पारमार्थिक आणि व्यावहारिक जीवनासाठीचे मार्गदर्शन संत साहित्यात आहे. संतानी सांगितलेली मुक्ती स्वकेंद्रित नसून विश्वाच्या सौख्यासाठी जीवन साधना आहे. संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी संत साहित्याची उठाठेव आहे, असे बाविस्कर म्हणाले. 

टॅग्स :मुंबई