मराठी शाळांचे एकत्रीकरण रद्द

By Admin | Updated: August 30, 2014 03:30 IST2014-08-30T01:30:17+5:302014-08-30T03:30:40+5:30

देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बोर्डाच्या हद्दीतील वार्ड क्रमांक सातमधील किन्हई व झेंडेमळ्यातील दोन्ही मराठी प्राथमिक शाळांचे चिंचोलीतील शाळेत होणारे एकत्रीकरणाचा करण्याचा निर्णय अखेर रद्द

The merger of Marathi schools is canceled | मराठी शाळांचे एकत्रीकरण रद्द

मराठी शाळांचे एकत्रीकरण रद्द

किवळे(पुणे) : देहूरोड कॅन्टोन्मेंट प्रशासनाने बोर्डाच्या हद्दीतील वार्ड क्रमांक सातमधील किन्हई व झेंडेमळ्यातील दोन्ही मराठी प्राथमिक शाळांचे चिंचोलीतील शाळेत होणारे एकत्रीकरणाचा करण्याचा निर्णय अखेर रद्द केला आहे.
मात्र देहूरोड व मामुर्डी येथील दोन सत्रांत चालणाऱ्या चार शाळांचे दोन शाळांत एकत्रीकरण करण्यात येणार असून, येत्या ८ सप्टेंबरपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. शाळा एकत्रीकरणाबाबत सातत्याने सविस्तर बातमी प्रसिद्ध करून पाठपुरावा केल्याबद्दल किन्हई, झेंडेमळ्यातील ग्रामस्थ व पालकांनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत.
कॅन्टोन्मेंट बोर्डाने जुलै महिन्याच्या अखेरीला घेतलेल्या एका निर्णयानुसार बोर्डाच्या एकूण सात प्राथमिक मराठी शाळांचे एकत्रीकरण करण्यात येणार होते. यात प्रामुख्याने बोर्डाच्या वॉर्ड क्रमांक सातमधील किन्हई व झेंडेमळ्यातील दोन्ही मराठी प्राथमिक शाळा बंद करण्यात येणार होत्या. या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांना चिंचोलीतील शाळेत जावे लागणार होते.
तसेच मामुर्डी व देहूरोड येथील मुला-मुलींच्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याकरिता दिवसेंदिवस बोर्डाच्या शाळांतील विद्यार्थिसंख्या झपाट्याने कमी होत आहे. काही शिक्षकांच्या जकात नाक्यावर, तर काही शिक्षकांच्या बोर्ड कार्यालयात बदली करण्यात आली होती.
किन्हई व झेंडेमळ्यातील मराठी शाळांचे एकत्रीकरण करण्यासंदर्भात ‘लोकमत’ ३० जुलैला सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. दोन्ही गावांतील ग्रामस्थ व पालकांनी किन्हईत तातडीने बैठक घेऊन बोर्डाच्या शाळा बंद करण्याच्या निर्णयाला सर्वांनी एकमुखी विरोध दर्शविला होता. तसेच भारतीय विद्यार्थी सेना, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शाहू-फुले-आंबेडकर मंचाने प्रखर विरोध दर्शविला होता. त्यानंतर बोर्ड प्रशासनाने पालक व ग्रामस्थ यांच्याशी चर्चा झाल्यावर शाळा एकत्रीकरणाबाबत निर्णय होणार असल्याचे सांगितले होते.
मुख्य अधिकारी अभिषेक त्रिपाठी यांनी देहूरोड येथील महात्मा गांधी प्राथमिक शाळेत नुकतीच किन्हई व झेंडेमळ्यातील सबंधित ग्रामस्थ, पालक व काही शाळांचे मुख्याध्यापक यांची एक संयुक्त बैठक घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात शाळा एकत्रीकरणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली होती.
या वेळी काळुराम पवार, संदीप गोंटे, संभाजी पिंजण, राजाभाऊ पिंजण, अविनाश पिंजण, विजय पिंजण आदी उपस्थित होते.
(वार्ताहर)

Web Title: The merger of Marathi schools is canceled