पारा चढला; मुंबई ३४ अंशावर!
By Admin | Updated: February 1, 2015 01:39 IST2015-02-01T01:39:47+5:302015-02-01T01:39:47+5:30
शहराच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली असतानाच शनिवारी शहराचा कमाल तापमानाचा पारादेखील थेट ६ अंशांनी वाढला आहे.

पारा चढला; मुंबई ३४ अंशावर!
मुंबई : शहराच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात येऊ लागली असतानाच शनिवारी शहराचा कमाल तापमानाचा पारादेखील थेट ६ अंशांनी वाढला आहे. शुकवारी शहराचे कमाल तापमान २७ अंश नोंदविण्यात आले होते, तर शनिवारी हेच कमाल तापमान ३४ अंश एवढे नोंदविण्यात आले आहे़ शहराच्या किमान आणि कमाल तापमानाचा पारा आता हळूहळू चढू लागला आहे.
उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव काहीसा ओसरल्याने राज्यातील प्रमुख शहरांच्या किमान तापमानात वाढ नोंदविण्यात आली होती. थंड वाऱ्याचा जोर कमी-अधिक होत असल्याने थंडीच्या लाटेचा जोरही ओसरत होता. परंतु आता पुन्हा पुढील २४ तासांत विदर्भात थंडीची लाट राहील आणि उर्वरित महाराष्ट्रात मात्र हवामान कोरडे राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. दुसरीकडे मागील २४ तासांत गोव्यासह राज्यात हवामान कोरडे नोंदविण्यात आले असून, विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा लक्षणीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकण-गोव्याच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीपेक्षा किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे.
गेल्या दहाएक दिवसांपासून मुंबईच्या वातावरणात उल्लेखनीय बदल झाले आहेत. १५ अंशावर असलेले किमान तापमान २० अंशावर येऊन ठेपले असून, २७ अंशावर असलेले कमाल तापमान ३४ अंशावर पोहोचले आहे. परिणामी, दिवसा घाम काढणारे ऊन आणि रात्री बोचणारी थंड हवा, असे दुहेरी वातावरण आहे. पुढील २४ तासांत मुंबईचे किमान आणि कमाल तापमान अनुक्रमे २०, ३३ अंशाच्या आसपास राहील, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.