पारा चढला तरी वऱ्हाडी डान्स जोशात
By Admin | Updated: April 2, 2015 00:19 IST2015-04-02T00:19:42+5:302015-04-02T00:19:42+5:30
यंदा ठाणे जिल्ह्यात तापमानाने कमाल मर्यादा गाठली आहे. तेव्हा उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. असे असले तरी लग्नकार्यात वराच्या

पारा चढला तरी वऱ्हाडी डान्स जोशात
राजेंद्र वाघ, शहाड -
यंदा ठाणे जिल्ह्यात तापमानाने कमाल मर्यादा गाठली आहे. तेव्हा उन्हामुळे अंगाची लाहीलाही होत आहे. असे असले तरी लग्नकार्यात वराच्या मिरवणुकीत भरउन्हात बॅण्डच्या तालावर ठेका धरून वऱ्हाडी मात्र बेधुंद होऊन नाचताना दिसतात. त्यामुळे वऱ्हाडी डान्सर पुढे तापमानाचा पारासुद्धा फिका पडला आहे.
यंदा लग्नकार्यासाठी मार्च महिन्यात फक्त ५, एप्रिलमध्ये ४, मेमध्ये १० आणि जून महिन्यात अवघे ६ मुहूर्त आहेत, तेसुद्धा १२ जूनपर्यंत. पुढे १७ जूनपासून अधिक मास सुरू होत आहे. तेव्हा मार्च महिना वगळता येत्या तीन महिन्यांत लग्नकार्यासाठी फक्त २० मुहूर्त आहेत. त्यामुळे सध्या उपलब्ध असलेल्या मुहूर्तांवर लग्नकार्य उरकण्यासाठी सर्वत्र लगबग सुरू असल्याचे दिसते. अशा लग्नकार्यासाठी आप्तस्वकीय अर्थात वऱ्हाडी आणि स्नेही हे आवर्जून उपस्थित असतात. त्यामुळे लग्नकार्यात आनंदाला उधाण आलेले असते. लग्नकार्यात इतर सर्व धार्मिक विधींसह गाणे, बजावणे व नाचणे यांनाही महत्त्व असते.
मात्र, या वर्षी ठाणे जिल्ह्याचे तापमान ४२ अंशांवर गेले असून तापमानाने कमाल मर्यादा गाठली आहे. दररोज वातावरणात बदल होत आहे. त्यामुळे सकाळी ९ वाजेपासूनच उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी १२ वाजेनंतर उन्हाचा तडाखा सहन करावा लागतो. असे असले तरी कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण जिल्ह्यात अशा कडक उन्हात सकाळी ११ ते दुपारी १ वाजेच्या दरम्यान रस्त्यास्त्यांवर, गल्लीबोळांत, नाक्यांवर व मंगल कार्यालयांच्या आसपास वराच्या मिरवणुकीत वऱ्हाडी घामाघूम होऊन बॅण्डच्या तालावर ठेका धरीत बेधुंद होऊन नृत्याविष्कार करताना दिसतात. विशेष म्हणजे यात महिलांसह चिमुकल्यांचाही लक्षणीय सहभाग असतो. तेव्हा कडक उन्हाला व वाढत्या तापमानालाही न जुमानता नृत्य करणारे वऱ्हाडी पाहता या वऱ्हाडींपुढे तापमानाचाही पारा फिका पडला आहे की काय, अशी शंका येते.