Join us  

अग्निशमन सेवेसाठी मानसिक कणखरता महत्त्वाची; मनपा आयुक्त भूषण गगराणींचे वक्तव्य 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:45 AM

प्रशिक्षण देण्यासाठी प्राधान्याने विचार करणार,असे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

मुंबई :मुंबईने अनेक नैसर्गिक व मानवी संकटांना यशस्वीपणे तोंड दिले असून, त्यात मुंबई अग्निशमन दलाचाही मोलाचा वाटा आहे. कोणत्याही संकटाला सामोरे जाताना मानसिक कणखरता ही महत्त्वाची भूमिका बजावते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या संसाधन व मनुष्यबळ सुसज्जतेसह मानसिक कणखरता प्रशिक्षणाचाही प्राधान्याने विचार करण्यात येईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी दिले.

सेवा बजावताना हुतात्मा झालेले अग्निशमन अधिकारी व जवान यांना राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त रविवारी भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गगराणी बोलत होते. महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालक संतोष वारीक, अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. अमित सैनी, उपायुक्त प्रशांत गायकवाड, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर, तसेच निवृत्त अधिकारी  उपस्थित होते.

मुंबईतील विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी आगामी काळात अत्याधुनिक यंत्रणा, साहित्य आणि उपकरणांसह अग्निशमन दल अधिक सक्षमपणे मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी तत्पर असेल, अशी ग्वाही गगराणी यांनी दिली. जोपर्यंत प्रतिबंधात्मक उपाय आपण करीत नाही, तोपर्यंत आगीसारख्या दुर्घटनांचा धोका कायम राहणार आहे. आगीच्या घटना घडू नयेत यासाठी जनजागृती केल्यास अशा दुर्घटना टाळता येऊ शकतात. नागरिकांसाठी प्रशिक्षणासारखे उपक्रमही राबविणे गरजेचे आहे. त्यामुळे अग्निसुरक्षा, अग्निप्रतिबंध उपक्रमांसाठी पालिका प्रयत्न करत राहील, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.

जितका समाज जागरूक होईल तितक्या प्रमाणात आगीच्या घटना टळू शकतात. अग्निशमन दल अत्याधुनिक यंत्रणेसह आणखी सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे डॉ. सैनी म्हणाले. आग लागताच काय उपाययोजना कराव्यात, यासाठी नागरिकांना प्राथमिक प्रशिक्षण दिल्यास संभाव्य हानी टाळता येऊ शकते, असे वारिक म्हणाले.

१९४४ मधील ती भीषण दुर्घटना-

१४ एप्रिल १९४४ रोजी मुंबई बंदरात ‘एस. एस. फोर्ट स्टिकीन’ या बोटीतील दारूगोळ्याच्या साठ्याने पेट घेतला. या भीषण आगीवर नियंत्रण मिळविताना अग्निशमनचे ६६ अधिकारी व जवानांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेच्या स्मरणार्थ १४ एप्रिलला ‘राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन’ पाळला जातो. त्यानिमित्ताने भायखळा येथे राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिन कार्यक्रम पार पडला. 

टॅग्स :मुंबईनगर पालिकाअग्निशमन दल