महिलांच्या डब्यात पुरुषांची घुसखोरी
By Admin | Updated: January 29, 2015 02:10 IST2015-01-29T02:10:32+5:302015-01-29T02:10:32+5:30
लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही पुरुष प्रवाशांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते

महिलांच्या डब्यात पुरुषांची घुसखोरी
मुंबई : लोकलमध्ये महिलांच्या राखीव डब्यातून पुरुष प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई आहे. मात्र असे असतानाही पुरुष प्रवाशांकडून त्याचे सर्रासपणे उल्लंघन केले जाते. अशा पुरुष प्रवाशांवर रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) कारवाई केली जात असून गेल्या दोन वर्षांतील कारवाई पाहिल्यास पुरुष प्रवाशांची घुसखोरी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. दोन वर्षांत पाच हजारपेक्षा अधिक पुरुष प्रवाशांनी घुसखोरी केली आहे.
लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी रेल्वे पोलिसांकडून (जीआरपी) प्रयत्न केला जात आहे. तीन वर्षांपूर्वी वाशी ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावर पहाटेच्या सुमारास लोकलमधील महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या एका
मुलीचा विनयभंग करण्यात आला होता.
याची माहिती आरपीएफला सदर मुलीने दिल्यानंतरही त्यांच्याकडून कुठलीच दखल घेण्यात आली नाही. या घटनेची न्यायालयाने दखल घेतल्यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे आणि पुरुष प्रवाशांना महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करण्यास मनाई करावी, असे आदेशही दिले. यानंतर महिला प्रवाशांच्या सुरक्षेकडे रेल्वे पोलिसांकडून प्राधान्य दिले जात आहे. तरीही महिला प्रवाशांच्या बाबतीतले गुन्हे काही कमी होताना दिसत
नाहीत. यात विविध गुन्ह्यांतर्गत २0१३ मध्ये ६९ आणि २0१४ मध्ये ७३ प्रकरणे रेल्वे पोलिसांकडे दाखल आहेत.
खून, खुनाचा प्रयत्न, बलात्कार, विनयभंग, पळवून नेणे, अश्लील हावभाव करणे अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. हे गुन्हे वाढत असतानाच दुसरीकडे महिलांच्या राखीव डब्यातून प्रवास करणाऱ्या पुरुष प्रवाशांचेही प्रमाण वाढत आहे.
गेल्या दोन वर्षांत ५ हजार ३३0 पुरुषांना पकडण्यात आले आहे. २0१३ मध्ये २ हजार ७१५ तर २0१४ मध्ये २ हजार ६१५ पुरुष प्रवाशांना पकडण्यात आल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)