मुंबई - गेल्या काही वर्षांमध्ये पुरुषांमध्ये अंडकोष, लिंग आणि प्रोस्टेट कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. मात्र अनेकदा पुरुष या आजारांवर फारसे बोलताना दिसत नाहीत. तसेच या कॅन्सरबद्दलही फार जनजागृती नाही. त्यामुळे टाटा मेमोरियल सेंटरने या आजारांवर उपचार, निदान आणि प्रतिबंध वेळेत व्हावा, यासाठी ‘मेनकॅन’ (पुरुषांचा कॅन्सर) उपक्रम सुरू केला आहे. विशेष करून पुरुषांमध्ये आढळणाऱ्या या कॅन्सरबद्दल सर्वसामान्य नागरिकांमध्ये माहिती आणि जनजागृतीवर काम केले जाणार आहे.
ग्लोबल कॅन्सर ऑबझर्व्हेटरी २०२२ नुसार, देशात प्रोस्टेट कॅन्सरच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. वयोमानानुसार प्रति १ लाख लोकांमध्ये १२.६ टक्के नवीन रोगनिदान अपेक्षित आहे. २०२५ मध्ये देशात प्रोस्टेट कॅन्सरचे अंदाजे ४१,७३६ नवीन रुग्ण पाहण्याचा अंदाज आहे. अंडकोषाच्या कॅन्सरचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. २०२५ पर्यत हे ४,६४० रुग्णांचे प्रमाण होण्याची शक्यता आहे. तर त्याच वर्षी लिंग कॅन्सरची ११,२६४ नवे रुग्ण दिसण्याची शक्यता आहे.
‘टाटा मेमोरियलमध्ये किती रुग्ण? टाटा मेमोरियल सेंटरमध्ये नवीन प्रोस्टेट कॅन्सरच्या रुग्णांची संख्या लक्षणीय अशी वाढली आहे. २०२१ मध्ये प्रोस्टेट कॅन्सरचे ७०० नवीन रुग्णांचे निदान झाले होते. २०२३ मध्ये ही संख्या वाढून ९०० झाली. याव्यतिरिक्त टाटा मेमोरियल सेंटर दरवर्षी लिंग कॅन्सरच्या १५० आणि अंडकोष कॅन्सरच्या २५० रुग्णांवर उपचार करते.
जनजागृती व्हावी, मिळेल एक आशेचा किरण...प्रोस्टेट कॅन्सर हा प्रामुख्याने ५० ते ६४ वयोगटातील पुरुषांना होतो. ‘मेनकॅन’ हा उपक्रम युरॉलॉजिकल ऑन्कोलॉजी डिसीज मॅनेजमेंट ग्रुपद्वारे राबविला जाणार आहे. सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ. गगन प्रकाश यांनी सांगितले की, हा केवळ एक उपक्रम नाही. तर या पुरुषांमधील कॅन्सरचा सामना करण्यासाठी एक आशेचा किरण आहे. नागरिकांना विनंती आहे की, या विषयावर जनजागृती करण्यासाठी मदत करावी. या पुरुषांमधील कॅन्सर आजाराची जनजागृती करण्यासाठी टाटा मेमोरियल सेंटरने ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून गायक शान यांची निवड केली आहे. पुरुषांमधील वाढत्या कॅन्सरला या उपक्रमामुळे आळा बसण्याची शक्यता आहे.