Join us  

महिलांपेक्षा पुरुष करतात आरोग्यावर सर्वाधिक खर्च; शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचत नसल्याचे उघड

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2019 5:25 AM

अहवालातील निष्कर्षानुसार, औषधांचा खर्च, डॉक्टरांची फी, वैद्यकीय चाचणी शुल्क, वैद्यकीय साहित्य यांचा खर्च महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक करतात.

- स्नेहा मोरेमुंबई : जीवनशैलीतील बदलांचे आक्रमण पुरुषांच्या, तसेच महिलांच्याही आरोग्यावर झाले आहे. मात्र, महिलांपेक्षा पुरुष आरोग्यावर सर्वाधिक खर्च करत असल्याची चिंताजनक बाब एका अभ्यासातून समोर आली आहे. महिलांना आरोग्य क्षेत्रातही अनंत अडचणींना सामोरे जावे लागते, त्यांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्यावे, यासाठी अनेक शासकीय योजनाही आहेत. मात्र, तरीही महिलांपर्यंत या आरोग्यविषयक योजना-सेवा पोहोचत नसल्याचे अभ्यास अहवालातून समोर आले आहे.

नॅशनल सॅम्पल सर्व्हे आॅर्गनायझेशनच्या अहवालानुसार, देशभरातील शासकीय रुग्णालयांत औषधोपचार घेणाऱ्या ३५ हजार ५१५ महिला व पुरुषांचा सहभाग या अभ्यास अहवालात आहे. त्यात पुरुष सरासरी २३ हजार ६६६ रुपये आरोग्यावर खर्च करतात, तर महिला १६ हजार ८८१ रुपये खर्च करतात. त्यानुसार, औषधोपचारांसाठी रुग्णालयात पुरुष महिलांपेक्षा अधिक काळ थांबतात.

अहवालातील निष्कर्षानुसार, औषधांचा खर्च, डॉक्टरांची फी, वैद्यकीय चाचणी शुल्क, वैद्यकीय साहित्य यांचा खर्च महिलांच्या तुलनेत पुरुष अधिक करतात. वर्षानुवर्षे आरोग्यसेवा क्षेत्रातही महिलांच्या आरोग्याकडे दुर्लक्षच होत असल्याची खेदजनक बाब अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. या स्थितीला विविध सामाजिक, आर्थिक आणि पारंपरिक रूढी - परंपरा अशा विविधकारणांची पार्श्वभूमी असल्याचे अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.

अहवाल काय सांगतो?देशातील ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा खर्च हा घर विकून, दागिने गहाण ठेवून, मित्रपरिवाराकडून पैसे उसने घेऊन केला जातो, असे निरीक्षणही अहवालात नोंदविले आहे. आपल्या आरोग्यविषक खर्चासाठी गुंतवणूक करणाºया व्यक्तींचा आढावा घेतल्यास त्यात पुरुषांचे प्रमाण ४५.७३ टक्के आहे, तर महिलांचे प्रमाण ५१.०२ टक्के आहे. देशभरात २७ टक्के महिलांना नोकरी आहे, अन्य महिला या घरगुती आणि केअरगिव्हींग क्षेत्रात काम करत असल्याने, त्यांच्याकडे थेट उत्पन्नाच्या स्रोतांचा अभाव आहे. परिणामी, याच कारणामुळे महिलांच्या आरोग्याला महत्त्व दिले जात नसल्याचे अहवालात अधोरेखित करण्यात आले आहे.आरोग्याचा प्रश्न गंभीरआरोग्यसेवा क्षेत्राबाबत आपल्याकडील शासकीय यंत्रणा अत्यंत उदासीन आहे. त्यामुळे आपल्याकडे आरोग्यसेवा क्षेत्राला पुरेसा निधी मिळत नाही. आरोग्यसेवा क्षेत्राची अवस्थाच मरणासन्न झाली आहे. त्यात आता या अभ्यासानुसार नोंदविलेले निरीक्षण चिंताजनक असून, आपण कुठल्या स्त्री-पुरुष समानतेविषयी बोलतो हा प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांच्या आरोग्यासाठीच्या असंख्य योजना आहेत. मात्र, त्यासाठी जनजागृती, निधी मिळून त्याची तळागाळांत अंमलबजावणी होणे गरजेचे आहे. महिलांच्या आरोग्याकडे होणाºया दुर्लक्षाला रूढी व परंपराही जबाबदार असून, सर्व स्तरांवर या मोडीत काढून महिलांच्या आरोग्याला प्राधान्य दिले पाहिजे.- डॉ. अनंत फडके, ज्येष्ठ आरोग्यसेवा कार्यकर्ते, जन आरोग्य अभियान.

टॅग्स :हॉस्पिटलआरोग्य