Join us  

मुंबईत अण्णा भाऊ साठे यांचे स्मारक उभारणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2020 5:15 AM

त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले, शताब्दीनंतरही अण्णा भाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे.

मुंबई : अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्यातून जनजागृती केली. त्यांच्या या कार्यातून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्यांची साहित्यसंपदा एका ठिकाणी उपलब्ध असणे आवश्यक आहे. यादृष्टीने त्यांच्या कार्याची जपणूक करणारे यथोचित स्मारक सर्वांच्या सहकार्याने मुंबईत लवकरच उभारले जाईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या सेंटर फॉर युरेशियन स्टडीज व रशियन विभागातर्फे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दीनिमित्त आयोजित आंतरराष्ट्रीय व्याख्यानमालेच्या सांगता समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

त्यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या स्मृतींना अभिवादन केले. मुख्यमंत्री म्हणाले, शताब्दीनंतरही अण्णा भाऊंची आठवण जिवंतपणा देते. त्यांचे साहित्य अजूनही लोकप्रिय आणि अलौकिक आहे. परखड मत मांडणाऱ्या अण्णा भाऊ साठे यांचे संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईतही मोठे योगदान होते, असे ते म्हणाले. हे वर्ष लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचे तर लोकशाहीर म्हणून लौकिक मिळविलेल्या अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे शताब्दी वर्ष आहे. एक तेज लोप पावले तर दुसरे उगवले हा विलक्षण योगायोग असल्याचे सांगत त्यांनी दोघांच्याही कार्याचा गौरव केला. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर, रशियन स्टेट युनिव्हर्सिटीतील अभ्यासक, विद्यापीठाच्या मध्य युरेशिया अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. संजय देशपांडे आदी उपस्थित होते.अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न द्या - पाटीलवाटेगाव (जि.सांगली) : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करावे, अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याची माहिती पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली. वाटेगाव (ता. वाळवा) येथे शनिवारी अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त स्मारक भवन येथे अभिवादन करण्यात आले.

टॅग्स :उद्धव ठाकरेमुंबई