मेहता पेट्रो रिफायनरीला भीषण आग

By Admin | Updated: December 27, 2014 22:29 IST2014-12-27T22:29:07+5:302014-12-27T22:29:07+5:30

आज सकाळी ९.३० वा. च्या सुमारास कंपनीत उभ्या असलेल्या टँकरमधून आणलेले हेक्झेन हे ज्वालाग्राही रसायन प्लॅस्टीक ड्रममध्ये खाली करीत असताना अचानक आग लागली.

Mehta Petro Refinery, a fierce fire | मेहता पेट्रो रिफायनरीला भीषण आग

मेहता पेट्रो रिफायनरीला भीषण आग

पालघर : पालघरच्या बिडको औद्योगिक वसाहतीमधील मेहता पेट्रो रिफायनरी या पेट्रोलियम पदार्थ उत्पादीत करणाऱ्या कंपनीमध्ये उभ्या असलेल्या टँकरमधून ज्वालाग्राही पदार्थ बाहेर काढत असताना अर्थीग बाबत पुरेशी काळजी न घेतल्याने लागलेल्या आगीत तीन ट्रँकर, तीन मोटरसायकलीसह कंपनीचा मोठा भाग जळून खाक झाला. अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला.
पालघरच्या माहिम ग्रामपंचायतअंतर्गत बिडको औद्योगिक वसाहतीमधील मेहता पेट्रो रिफायनरी ही कंपनी असून आॅईल मधून डिस्टीलेशन (उर्ध्वपतन) करून शुद्ध पेट्रोलियम पदार्थ या केमीकल कंपनीमध्ये तयार केले जातात. आज सकाळी ९.३० वा. च्या सुमारास कंपनीत उभ्या असलेल्या टँकरमधून आणलेले हेक्झेन हे ज्वालाग्राही रसायन प्लॅस्टीक ड्रममध्ये खाली करीत असताना अचानक आग लागली. या संदर्भात एकच ओरड झाल्यानंतर सर्व कामगार सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. पोलीस प्रशासनाने आजूबाजूच्या सर्व कंपनीमधील कामगारांना सुरक्षितस्थळी हलवित कंपन्या बंद केल्या. टँकरमधील रसायनांनी व बाजूच्या ड्रममधील रसायनांनीही मोठी आग पकडल्याने व ही आग पसरत गेली. त्यामुळे मोठ्या जीवीत व वित्तीहानीची शक्यता निर्माण झाली होती. परंतु पालघर नगरपरिषद, तारापूर औद्योगिक वसाहत आणि वसई महानगरपालिकेच्या तीन अग्निशमन बंबांनी शर्थीचे प्रयत्न करून ही आग आटोक्यात आणण्यात यश मिळविले. यावेळी तीन ट्रक, तीन मोटरसायकली, सायकली व कंपनीचा मोठा भाग जळून खाक झाला.
मेहता पेट्रो रिफायनरी कंपनीमध्ये उभ्या असलेल्या टँकरमधून हेक्झेन हे ज्वालाग्राही रसायन प्लॅस्टीक ड्रममध्ये खाली करीत असताना प्लॅस्टीकच्या घर्षणाने निर्माण होणारे स्टॅटीक चार्ज रोखण्यासाठी आर्थींगची व्यवस्था करण्यात आली नसल्याने ही आग लागल्याची शक्यता वर्तविली जात असून या कंपनीमध्ये आग लागण्याची ही तिसरी घटना असल्याची माहिती पुढे आली आहे. या आगी लागण्यामागे वेगळा हेतू तर नाही ना? अशी चर्चाही वर्तविली जात आहे. या कंपनीमध्ये १७-१८ रासायनिक पदार्थांचा मंजूरीपेक्षा अधिक प्रमाणात साठा केल्याप्रकरणी या कंपनीचे मालक परेश मेहता यांच्याविरोधात पालघर तहसिलदाराने गुन्हा दाखल केल्याची माहिती तहसिलदार चंद्रसेन पवार यांनी पत्रकारांना दिली. अत्यंत वादग्रस्त ठरलेल्या या रासायनिक कंपनी विरोधात पोलीस, सुरक्षा संचलनालय, प्रदूषण मंडळ कोणती भूमीका घेते याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

 

Web Title: Mehta Petro Refinery, a fierce fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.