Join us
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्याची कामे रखडल्याने ‘मेघा’ला झाला होता साडेतीन कोटींचा दंड; मुंबई महापालिकेतही कंत्राटे

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2024 05:57 IST

मेघा इंजिनीअरिंगला दहिसर वर्सोवा मार्गातील कामाचेही कंत्राट मिळाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: निवडणूक रोखे खरेदीदारांच्या यादीत समावेश असलेल्या मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडने मुंबई महापालिकेत दोन मोठी कंत्राटे यापूर्वीच मिळवली आहेत. वर्सोवा ते दहिसर प्रकल्पातील दोन टप्प्यांची तसेच पश्चिम उपनगरातील एका रस्त्याचे कंत्राट या कंपनीला मिळाले आहे. मात्र, रस्त्याची कामे रखडल्याने कंपनीला मध्यंतरी साडेतीन कोटी रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला होता.

मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार, सर्व रस्ते काँक्रीटचे केले जाणार आहेत. सुमारे सहा हजार कोटी रुपयांची ही कामे आहेत. काही कामांच्या निविदाही काढण्यात आल्या आहेत. मुंबई महापालिकेकडून शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगरातील रस्त्यांच्या कामासाठी पाच निविदा मागविण्यात आल्या. त्यापैकी पश्चिम उपनगरातील परिमंडळ चारमधील १,६३१ कोटी रुपयांची कामे मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडला देण्यात आली. परंतु कार्यादेश देऊनही रस्त्याचे काम रखडल्यामुळे या कंपनीला साडेतीन कोटींचा दंडही ठोठावण्यात आला होता. 

समांतर बोगद्याचे मिळाले काम

मेघा इंजिनीअरिंगला दहिसर वर्सोवा मार्गातील कामाचेही कंत्राट मिळाले आहे. हा मार्ग एकूण १८ किमीचा असून, मार्गातील सहा टप्प्यांपैकी चारकोप ते मालाड माइंड स्पेसपर्यंतच्या समांतर बोगद्याचे काम या कंपनीला मिळाले आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका