Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक; चिंचपोकळी, करी रोड येथे लोकलना थांबा नसेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 05:20 IST

भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४२ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल.

मुंबई : रेल्वे रुळांची देखभाल-दुरुस्ती तसेच अन्य कामांसाठी रविवारी मध्य रेल्वे मार्गावरील भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येईल. परिणामी चिंचपोकळी, करी रोड येथे लोकल थांबणार नाहीत. पश्चिम रेल्वे मार्गावर भार्इंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात आला आहे. या वेळी लोकल जलद मार्गावरून धावतील. तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दोन्ही दिशेकडील मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ३.४० पर्यंत लोकल रद्द करण्यात येतील.

भायखळा-विद्याविहार स्थानकांदरम्यान रविवार २ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.४२ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत धिम्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत भायखळा स्थानकातून कल्याण दिशेकडे जाणाऱ्या धिम्या लोकल भायखळा ते विद्याविहार स्थानकांदरम्यान जलद मार्गावरून धावतील. या लोकलना दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला येथे थांबा असेल. मात्र, विद्याविहारपासून त्या धिम्या मार्गावर धावतील. ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करी रोड येथे लोकलला थांबा नसेल.

हार्बर मार्गावरून सीएसएमटीहून वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाºया लोकल रविवारी सकाळी १०.३४ ते दुपारी ३.०८ पर्यंत रद्द करण्यात येतील. सकाळी १०.२१ ते दुपारी ३ वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सीएसएमटीकडे एकही लोकल धावणार नाही. ब्लॉक दरम्यान सीएसएमटी-कुर्ला आणि वाशी-पनवेल यादरम्यान विशेष लोकल धावतील.

पश्चिम रेल्वे मार्गावरील भार्इंदर ते वसई रोड स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत दोन्ही दिशेकडील धिम्या मार्गावर जम्बोब्लॉक असेल. या वेळी बोरीवली ते विरारदरम्यान धिम्या लोकल जलद मार्गावर धावतील, तर काही लोकल रद्द करण्यात येतील.

टॅग्स :मुंबई लोकल