लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : काँग्रेसचा हात सोडून आगामी महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची शिवसैनिकांची मागणी असल्याचा अहवाल उद्धवसेनेच्या पक्ष निरीक्षकांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला होता. त्यानंतर ठाकरे हे मातोश्री येथे विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, विधानसभा संघटक यांच्यासोबत बैठका घेऊन संघटनात्मक आढावा घेत आहेत. या बैठकांमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी स्वबळाचा सूर उमटवला, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
उद्धव यांनी २६ आणि २७ डिसेंबर रोजी मातोश्री येथे मुंबईतील १६ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला होता. त्यानंतर त्यांनी १४ विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. गुरुवारी ९ जानेवारीला उर्वरित दक्षिण मुंबईतील ६ विधानसभा मतदारसंघांचा ते आढावा घेणार आहेत. आतापर्यंत झालेल्या बैठकांमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी कोणासोबतही युती किंवा आघाडी न करता उद्धवसेनेने स्वबळावर निवडणुका लढाव्यात, असे मत व्यक्त केल्याचे सुत्रांनी सांगितले.
मातोश्री येथे पक्ष प्रमुख ठाकरे सर्व पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत. आघाडीमध्ये पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांना न्याय मिळत नाही. त्यामुळे स्वबळावर लढल्यास मोठ्या संख्येने उमेदवार निवडणुकीत निवडून येतील, असे पदाधिकाऱ्यांनी बैठकीदरम्यान सांगितले.
अनेकांनी स्वबळाची मागणी केली असली तरी पक्षप्रमुख यांच्यावर अंतिम निर्णय सोपवण्यात आला आहे. उद्धवसेनेच्या अंगीकृत संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत ते बैठक घेणार आहेत. मुंबईतील प्रत्येक शाखेला ते भेट देणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे, असे सूत्रांनी सांगितले.
महिला आघाडीसोबत स्वतंत्र चर्चा
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी ५० टक्के आरक्षण राखीव ठेवण्यात आले आहे. २०१७च्या महापालिका निवडणुकीत निवडून आलेल्या उद्धवसेनेच्या काही प्रमुख महिला नगरसेविकांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात सक्षम महिला उमेदवार देण्यासाठी उपनेत्या ज्योती ठाकरे, उपनेत्या प्रवक्त्या संजना घाडी, माजी महापौर श्रद्धा जाधव, किशोरी पेडणेकर अशा महिला आघाडीच्या नेत्यांसोबत ठाकरे स्वतंत्र चर्चा करणार आहेत, अशी माहितीही या सुत्रांनी दिली.