एलिफंटा बेटाला वीज पुरवठ्याबाबत बैठक

By Admin | Updated: June 3, 2015 22:46 IST2015-06-03T22:46:38+5:302015-06-03T22:46:38+5:30

जागतिक कीर्तीच्या आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये गणना केलेल्या एलिफंटा बेटावरील अंधार कायम दूर करण्याबाबत चर्चेसाठी १० जून रोजी संबंधित अधिकाऱ्यांची

Meeting about electricity supply to Elephanta Island | एलिफंटा बेटाला वीज पुरवठ्याबाबत बैठक

एलिफंटा बेटाला वीज पुरवठ्याबाबत बैठक

उरण : जागतिक कीर्तीच्या आणि वर्ल्ड हेरिटेजमध्ये गणना केलेल्या एलिफंटा बेटावरील अंधार कायम दूर करण्याबाबत चर्चेसाठी १० जून रोजी संबंधित अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविण्याचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत.
जागतिक पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेटावर दरवर्षी १०-१२ लाखांहून अधिक पर्यटक भेट देतात. पर्यटनातून देशाला लाखो रुपयांचे परदेशी चलन मिळवून देणारे एलिफंटा मात्र कायमस्वरुपी विजेपासून वंचित राहिले आहे. एलिफंटा बेटाला सभोवार जेएनपीटी, बुचर आयलँड, चेंबूर रिफायनरी, भाभा अणुशक्ती केंद्र, नौदल असे विविध शासकीय प्रकल्प ८५० मीटरपासून पाच किमी अंतरापर्यंत आहेत. या प्रकल्पांवर रात्री विजेचा झगमगाट असताना एलिफंटा बेट मात्र अंधारात चाचपडत आहे. बेटावरील अंधार दूर केलेल्या घोषणा कागदावरच राहिल्या आहेत.
एलिफंटा बेटाला चोवीस तास कायमस्वरूपी वीजपुरवठा व्हावा या मागणीसाठी घारापुरी ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेना उपविभाग प्रमुख बळीराम ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी उपसरपंच विजयेंद्र घरत, घारापुरी द्वीप विकास मंडळाचे उपाध्यक्ष रमेश पाटील, सेक्रेटरी सचिन म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते. शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर एलिफंटा बेटावर चोवीस तास कायमस्वरुपी वीज पुरवठा करण्यासाठी १० जून रोजी महावितरण, एमटीडीसी आणि संबंधित शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलविण्याचे आदेश ऊर्जामंत्र्यांनी दिले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Meeting about electricity supply to Elephanta Island

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.