Join us  

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 8:20 AM

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.

ठळक मुद्देडॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती.आता डॉ. अंकिता खंडेलवालला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

मुंबई - डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी तिन्ही आरोपी डॉक्टरांनाअटक करण्यात आली आहे. याआधी डॉ. भक्ती मेहर, डॉ. हेमा आहुजा या दोन डॉक्टरांनाअटक करण्यात आली होती. त्यानंतर आता डॉ. अंकिता खंडेलवालला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे.

तीन महिला सहकारी डॉक्टरांकडून होणाऱ्या रँगिंगला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी गळफास घेऊन नायर हॉस्पिटलच्या वसतिगृहात आत्महत्या केल्याची धक्कादायक नुकतीच घटना घडली आहे. याप्रकरणी आग्रीपाडा पोलीस ठाण्यात तीन महिला डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तिन्ही डॉक्टरांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. या घटनेनंतर नायर रुग्णालयाबाहेर आंदोलनं देखील करण्यात आली होती.

राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी आंदोलनस्थळी भेट दिली आणि आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अशी माहिती दिली होती. संबंध राज्यात होणारा उद्रेक पाहता पोलिसांनी कारवाईचा बडगा उचलत डॉ. भक्ती हिला बेड्या ठोकल्या होत्या याप्रकरणात अन्य दोन महिला डॉक्टर डॉ. अंकिता खंडेलवाल आणि डॉ. हेमा आहुजा या फरार होत्या. मात्र त्यांना अटक करण्यात आली आहे. तिन्ही महिला डॉक्टरांनी कोर्टात अटक टाळण्यासाठी अटकपूर्व जामिनाचे अर्ज दाखल केले आहेत. आज या अटकपूर्व जामीन अर्जावर कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

टोपीवाला राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालय आणि बीवायएल नायर हॉस्पिटलमध्ये पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या स्त्री रोग विभागात दुसऱ्या वर्षात (एम.डी) शिक्षण घेत असलेल्या डॉ.पायल तडवी यांना वरिष्ठ असलेल्या सहकारी डॉ. हेमा आहुजा, डॉ.भक्ती मेहेरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघांकडून मानसिक त्रास आणि अपमानित केले जात होते. याला कंटाळून पायलने टोकाचा निर्णय घेत गळफास घेऊन आत्महत्या केली. पायलचे फेब्रुवारी 2016 साली सलमान तडवी यांच्या लग्न झाले. सलमान सध्या कूपर रुग्णालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करतात. ते मूळचे भुसावळच्या रावेर येथील आहेत. पायलने यापूर्वी गडचिरोली जिल्ह्यात डॉक्टर म्हणून काम केले आहे. तीन महिला डॉक्टरांविरोधात आग्रीपाडा पोलीस ठाण्यातअ‍ॅट्रॉसिटी, रॅगिंगविरोधी कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

पायलची जात माहीत नव्हती; आरोपींचा दावा

 डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या तीन वरिष्ठ डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी आहे. डॉ. हेमा अहुजा (28), डॉ. भक्ती मेहरे (26) व डॉ. अंकिता खंडेलवाल (27) या तिन्ही डॉक्टरांवर तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघींनी तडवीला छळल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. अहुजा आणि खंडेलवाल यांनी त्यांच्या जामीन अर्जात म्हटले आहे की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ‘पायल नोव्हेंबर 2018 ते डिसेंबर 2018 या महिन्यात तिची जबाबदारी टाळत होती. त्यानंतर अचानकपणे तिने रुग्णालयात येणे थांबविले. रुग्णालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता आणि अतिरिक्त ताण, याविषयी तिच्या आईनेच एफआयआरमध्ये नमूद केले आहे. पायलने रुग्णालयात येऊन तिला दिलेले काम पूर्ण करणे अपेक्षित असताना तिने रुग्णालयात अनुपस्थित राहणे पसंत केले. त्यामुळे जर पायलला ‘भगौडा’ असे चिडविण्यात आले तर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही किंवा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हाही ठरत नाही. पायल अनुसूचित जमातीतील आहे, याची माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळे आम्ही निर्दोष आहोत. आम्ही पायलला त्रास दिलेला नाही,’ असे अहुजा आणि खंडेलवाल यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.

 

टॅग्स :पायल तडवीमुंबईमुंबई पोलीसअटकडॉक्टर