पायलची जात माहीत नव्हती; आरोपींचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 06:06 AM2019-05-29T06:06:47+5:302019-05-29T06:06:58+5:30

डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या तीन वरिष्ठ डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.

Priyanka did not know; The accused claimed | पायलची जात माहीत नव्हती; आरोपींचा दावा

पायलची जात माहीत नव्हती; आरोपींचा दावा

Next

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येप्रकरणी आरोपी असलेल्या तीन वरिष्ठ डॉक्टरांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर बुधवारी सत्र न्यायालयात सुनावणी आहे. दरम्यान, एका आरोपी डॉक्टरला पोलिसांनी अटक केल्याने तिच्या अर्जात तथ्य उरलेले नाही. त्यामुळे तिच्या जामीन अर्जावर सुनावणी घेण्यात येणार नाही.
डॉ. हेमा अहुजा (२८), डॉ. भक्ती मेहरे (२६) व डॉ. अंकिता खंडेलवाल (२७) या तिन्ही डॉक्टरांवर तडवीला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघींनी तडवीला छळल्याने तिने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
तडवीने पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी नायर रुग्णालयात आरक्षित कोट्यातून प्रवेश मिळविला होता. त्यावरून या तिघी डॉक्टर तिच्यावर जातिवादात्मक टीका करून तिचा छळ करू लागल्या. त्याला कंटाळून २२ मे रोजी वसतिगृहाच्या खोलीत तिने आत्महत्या केली.
अहुजा आणि खंडेलवाल यांनी त्यांच्या जामीन अर्जात म्हटले आहे की, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. ‘पायल नोव्हेंबर २०१८ ते डिसेंबर २०१८ या महिन्यात तिची जबाबदारी टाळत होती. त्यानंतर अचानकपणे तिने रुग्णालयात येणे थांबविले. रुग्णालयात उपस्थित राहण्याची आवश्यकता आणि अतिरिक्त ताण, याविषयी तिच्या आईनेच एफआयआरमध्ये नमूद केले आहे. पायलने रुग्णालयात येऊन तिला दिलेले काम पूर्ण करणे अपेक्षित असताना तिने रुग्णालयात अनुपस्थित राहणे पसंत केले. त्यामुळे जर पायलला ‘भगौडा’ असे चिडविण्यात आले तर तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे म्हणता येणार नाही किंवा अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हाही ठरत नाही. पायल अनुसूचित जमातीतील आहे, याची माहिती आम्हाला नव्हती. त्यामुळे आम्ही निर्दोष आहोत. आम्ही पायलला त्रास दिलेला नाही,’ असे अहुजा आणि खंडेलवाल यांनी जामीन अर्जात म्हटले आहे.
‘पायलची जात माहीत नव्हती’
अर्जदार अािण पायल यांच्यात केवळ कामासंबंधी चर्चा व्हायची. पायल कोणत्या जातीची आहे, हे त्यांना माहीत नव्हते. त्यामुळे पायलच्या जातीवरून तिचा छळवाद करण्याचा प्रश्न येत नाही. अर्जदार क्रमांक ३ (खंडेलवाल) ने सप्टेंबर २०१८ मध्ये डॉ. क्ले यांच्यासह काम करण्यास सुरुवात केली आणि पायलने डिसेंबर २०१८ पासून सुट्टी घेतली. त्यामुळे दोघींचा काहीही संबंध नाही. पायलने डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ पर्यंत वेगळ्या विभागात काम केले. अर्जदार अहोरात्र निरनिराळ्या जातीच्या व धर्माच्या लोकांवर उपचार करतात. जर त्यांना पायलने त्यांच्याबरोबर काम करू नये, असे वाटत होते, तर त्यांनी कधीच तिच्याबरोबर काम केले नसते. पायलने या तिघींना अनेक शस्त्रक्रियांसाठी साहाय्य केले आहे. आत्महत्येच्या दिवशी तिने अर्जदार १ (हेमा अहुजा) आणि अर्जदार २ (भक्ती मेहरे) यांच्याबरोबर दोन शस्त्रक्रिया केल्या. याचाच अर्थ पायल या दोघींबरोबरही मोकळेपणाने काम करू शकत होती. त्या तिला काम करू देत होत्या,’ असेही अर्जात म्हटले आहे.
>‘छळाबाबत तक्रार केलीच नव्हती’
पायलने व तिच्या घरच्यांनी वरिष्ठांना तक्रार केली असतानाही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले, यात तथ्य नाही, असे या आरोपींचे म्हणणे आहे. ‘पायल याबाबत वरिष्ठांकडे तक्रार करू शकत होती, मात्र तिने आपली छळवणूक करण्यात येत आहे, अशी तक्रार कधीच केली नाही. वरिष्ठांकडे तक्रार केल्याचा दावा तिची आई करत आहे आणि वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सगळ्यांना सांगत आहे. त्यांच्या या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे संबंधित प्रशासनाने पडताळून पाहावे. तिचा पती एका प्रसिद्ध सरकारी रुग्णालयात लेक्चरर आहे. तसेच ती स्वत: विद्यार्थिनी आहे. त्यामुळे तिला वरिष्ठांकडे तक्रार करण्याची पूर्ण संधी होती. तरीही तिने याबाबत स्वत:हून कधीच तक्रार केली नाही,’ असे अर्जदारांचे म्हणणे आहे.
>‘...तर तिने नोकरी सोडायला हवी होती’
‘आरोपींनी पायलचा छळ केला, असे युक्तिवादापुरते जरी गृहीत धरले तरी त्यामुळे तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले, असे म्हणू शकत नाही. आपल्या कामात परिपूर्ण असलेले काही लोक त्यांच्यापेक्षा कामात कमी सक्षम असलेल्या लोकांची चेष्टा करू शकतात. अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते.
पायलने विद्यार्थी किंवा प्रशिक्षणार्थी असताना जसे वागणे अपेक्षित आहे आणि तसे ती वागत नसेल तर काही लोकांनी तिची मस्करी करणे स्वाभाविक आहे. जर तिला हे सहन होत नव्हते तर तिने नोकरी सोडायला हवी होती,’ असेही अर्जदारांनी अर्जात म्हटले आहे.
>टोमणे मारल्याचा
आरोप फेटाळला!
पायलने ग्रुपबरोबर लंच घेतल्याचे फोटो टाकल्याबद्दल तिला टोमणे मारण्यात आल्याचा आरोप फेटाळताना आरोपींनी अर्जात म्हटले की, पायल त्यांच्याबरोबर लंचला गेली नव्हती. आत्महत्येच्या आदल्या दिवशी ती त्यांच्याबरोबर डिनरला गेली होती. त्यामुळे डिनरची वेळ आणि तिच्या आत्महत्येची वेळ यात तफावत आहे.

Web Title: Priyanka did not know; The accused claimed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.