चाळिशी पार पोलिसांची वैद्यकीय तपासणी
By Admin | Updated: August 11, 2015 04:28 IST2015-08-11T04:28:00+5:302015-08-11T04:28:00+5:30
महानगर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने बंदोबस्तामुळे नेहमी तणावाखाली वावरणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे.

चाळिशी पार पोलिसांची वैद्यकीय तपासणी
मुंबई : महानगर अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असल्याने बंदोबस्तामुळे नेहमी तणावाखाली वावरणाऱ्या मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची मोफत वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. विशेषत: चाळिशी पार केलेल्या २५ हजारांवर पोलिसांची तातडीने तपासणी केली जाणार आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी आज सकाळी नागपाडा येथील पोलीस रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. रुग्णालयात आवश्यक सुविधा व साधने पुरविण्याबरोबरच रिक्त पदे भरण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ते म्हणाले, आगामी गणेशोत्सव आणि अन्य सणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांवर बंदोबस्ताचा मोठा ताण पडणार आहे. मानसिक तणावामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन रक्तदाब, मधुमेह, हृदयविकारासारख्या आजारांनी ते ग्रासले गेले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागामार्फत मुंबई पोलीस दलातील ४० वर्षांवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. भविष्यातील सणासुदीचे दिवस लक्षात घेता त्यापूर्वीच ही तपासणी करून घेण्यात येईल. खासगी वैद्यकीय प्रयोगशाळांचे या वैद्यकीय चाचण्यांसाठी सहकार्य घेण्यात येईल. महिला पोलिसांसाठीच्या वैद्यकीय तपासणीसाठी विशेष मोहीम घेतली जाणार आहे. खासकरून कर्करोगविषयक विभागवार तपासणी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
नागपाडा पोलीस रुग्णालय तसेच त्या अधिपत्याखालील १२ पोलीस रुग्णालयांमधील जी रिक्त पदे आहेत, ती तातडीने भरण्यात येतील. चार शवविच्छेदन केंद्रे आहेत तेथील रिक्त पदेदेखील तातडीने भरली जातील. या वेळी आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, मुंबई पोलीस आयुक्त राकेश मारिया आदी यावेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)