Join us
Daily Top 2Weekly Top 5

सत्ता निरंकुश होऊ नये यासाठी माध्यमांनी सजग असावे - मुख्यमंत्री फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2019 02:04 IST

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ सुरू केली आहे.

मुंबई : सत्ता निरंकुश होऊ न देण्यासाठी माध्यमांनी सजग असले पाहिजे. ही भूमिका त्यांनी जबादारीने पार पाडावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण झाले, त्या वेळी ते बोलत होते.राष्ट्रीय स्तरावर पत्रकारिता क्षेत्रात योगदान देणाऱ्या महाराष्ट्रातील पत्रकारास यंदापासून ‘अटलबिहारी वाजपेयी पत्रकारिता पुरस्कार’ दिला जाईल, अशी घोषणा फडणवीस यांनी केली. या कार्यक्रमात २०१७ आणि २०१८ साठीचा ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ अनुक्रमे रमेश पतंगे आणि पंढरीनाथ सावंत यांना मुख्यमंत्र्यांनी प्रदान केला. प्रत्येकी १ लाख रुपये रोख आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. २०१६ साठीचा ‘लोकमान्य टिळक जीवनगौरव पत्रकारिता पुरस्कार’ दै. ‘हितवाद’चे संपादक विजय फणशीकर यांना जाहीर झाला आहे.राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांप्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी ‘आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना’ सुरू केली आहे. काही ज्येष्ठ पत्रकारांना धनादेशाचे वितरण करून फडणवीस यांनी या योजनेचा शुभारंभ केला. निवृत्त पत्रकारांना मासिक ११ हजार रुपये सन्मानधन देण्यात येणार आहे. मुख्यमंत्री म्हणाले की, मुद्रित माध्यमांपासून सुरू झालेला माध्यमांचा प्रवास आता इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांपर्यंत झाला आहे. या संक्रमणावस्थेतही माध्यमांनी आपली मूल्ये जपावित. मूल्याधिष्ठित पत्रकारिता करून माध्यमांनी विश्वासार्हता जपावी.पुरस्कार विजेत्यांपैकी पत्रकार कांचन श्रीवास्तव आणि राजकुमार सिंह यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम मुख्यमंत्री साहाय्यता निधीस देत असल्याची घोषणा केली.पुरस्कारांवर ‘लोकमत’चे वर्चस्व : राज्य स्तरावरील ‘तोलाराम कुकरेजा उत्कृष्ट वृत्तपत्र छायाचित्रकार पुरस्कार - २०१७’ हा लोकमत मुंबईचे वरिष्ठ छायाचित्रकार दत्ता खेडेकर यांना तर २०१८चा पुरस्कार लोकमत नाशिकचे प्रशांत खरोटे यांना प्रदान करण्यात आला. राज्य स्तरावरील ‘बाबूराव विष्णू पराडकर पुरस्कार (हिंदी)’ लोकमत समाचारचे दिनेश मुडे (अकोला) यांना, कोल्हापूर विभागाचा ‘ग. गो. जाधव पुरस्कार’ लोकमत कोल्हापूरच्या इंदुमती गणेश (सूर्यवंशी) यांना तर नागपूर विभागाचा ‘ग. त्र्यं. माडखोलकर पुरस्कार’ लोकमत नागपूरचे योगेश पांडे यांना प्रदान करण्यात आला. ‘आचार्य अत्रे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार - २०१७’ ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे मुख्य वार्ताहर जमीर काझी यांना प्रदान करण्यात आला. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख, मानचिन्ह आणि प्रशस्तिपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे. याशिवाय ‘महाराष्ट्र माझा छायाचित्र स्पर्धा - २०१७’चा उत्तेजनार्थ पुरस्कार लोकमत मुंबईचे छायाचित्रकार सुशील कदम यांना प्रदान करण्यात आला.

टॅग्स :देवेंद्र फडणवीस