गोवरचा उद्रेक: मुंबईतील धारावीमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज!

By सचिन लुंगसे | Published: November 20, 2022 04:45 PM2022-11-20T16:45:54+5:302022-11-20T16:46:42+5:30

धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या हे मोठे आवाहन आहे व त्याचप्रमाणे काही प्रमाणात लसीकरणविषयीची उदासीनता व विरोध दिसून येतो.

measles outbreak health system ready in mumbai dharavi | गोवरचा उद्रेक: मुंबईतील धारावीमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज!

गोवरचा उद्रेक: मुंबईतील धारावीमध्ये आरोग्य यंत्रणा सज्ज!

Next

मुंबई: गोवर आजाराचा संपूर्ण महाराष्ट्र आणि मुंबई शहराच्या काही भागात झालेल्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर धारावीमध्ये सदर आजाराचा शिरकाव होऊन उद्रेक होण्याआधी योग्य त्या उपाययोजना करण्यास जी/उत्तर मनपा विभागाची यंत्रणा सज्ज झाली आहे. सदर आजाराचा उद्रेक रोखण्याआधी महत्वाचे आवाहन म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्तीतजास्त घरांना भेटी देऊन ० ते ५ वयोगटातील मुलांचे सर्वेक्षण करून कोणीही बालक ताप, अंगावर पुरळ अशी लक्षणे आढळल्यास त्यांना 'अ' जीवनसत्वाची मात्रा देणे, त्यावर योग्य औषधोपचार व गोवरविरोधी लसीकरण व नियमित लसीकरण कार्यक्रमांमध्ये ज्या बालकांचे गोवरविरोधी लसीकरण बाकी असेल त्याचे लवकरात लवकर लसीकरण करणे.
 
धारावीसारख्या मोठ्या झोपडपट्टीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या हे मोठे आवाहन आहे व त्याचप्रमाणे काही प्रमाणात लसीकरणविषयीची उदासीनता व विरोध देखील दिसून येतो. गोवरविरोधी मोहिमेचा प्रमुख भाग म्हणजे एकूण लोकसंख्येमधील ० ते कोणत्याही वयोगटातील ताप व अंगावरील पुरळ असणाऱ्या व्यक्तीची माहिती घेणे व ० ते ५ वयोगटातील गोवर व गोवर रुबेला लसीकरणाकरिता पात्र लाभार्थी शोधून त्यांचे गोवर रुबेला विरोधी लसीकरण करणे. जी/उत्तर विभाग गोवरकरिता अतिदक्ष म्हणून घोषित केल्यापासून सर्वच प्रकारच्या कामांना वेग आला आहे.

सर्व आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारी व आरोग्य स्वयंसेविकांमार्फत चालू केलेल्या सर्वेक्षणात आजमितीपर्यंत २१५६२८ लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले असून त्यामध्ये एकूण ताप व पुरळ याचे ५९ रुग्ण शोधण्यात आहे असून त्यांना 'अ' जीवनसत्वाची मात्रा देण्यात आली आहे. संबंधित रुग्णांचे रक्तनमुने गोवरचे निदान करण्याकरिता पाठविण्यात आले असून त्यामध्ये ५ गोवर रुग्ण आढळून आहे आहेत. सध्या सर्व रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. दि. १४.११.२०२२ पासून घरोघरी करण्यात येणाऱ्या सर्वेक्षणाचा वेग वाढवून सर्व लोकसंख्येचे सर्वेक्षण येणाऱ्या १० दिवसांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ठ आहे. त्याचप्रमाणे एकूण ८६८ गोवर विरोधी लसीकरणाकरिता पात्र लाभार्थी मुलांचे येणाऱ्या १० दिवसात लसीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.

त्यादृष्टीने आरोग्य केंद्रात होणाऱ्या नियमित लसीकरण सत्रांसोबत अतिरिक्त लसीकरण सत्रे प्रत्यक्ष झोपडपट्टी विभागात भरविले जात आहे. आजपर्यंत एकूण ११९ शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून येणाऱ्या १० दिवसात आणखी ५० लसीकरण शिबिरे आयोजित करून कोणतेही ९ महिने ते ५ वर्षापर्यंतचे बालक लसीकरणातून सुटणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. रविवार दि. २०.११.२०२२ रोजी ज्या दिवशी सर्व पालक व बालके घरी असल्याकारणाने संपूर्ण जी/उत्तर विभागात एकूण २३ लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. 

जनमानसात गोवर रुबेला आजाराबाबत जनजागृती करण्याकरिता संपूर्ण विभागात गोवरबाबतचे बॅनर्स लावण्यात आले असून आरोग्य सेविका तसेच घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या दत्तक वस्ती योजनेतील कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी माहितीपत्रके वाटण्यात येत असून आजतागायात १५००० माहितीपत्रके वाटण्यात आली असून सदर काम दैनंदिन चालू आहे. जी/उत्तर विभागातील एकूण ४५० खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना गोवर सदृश्य संशयित रुग्णांची माहिती ताबडतोब वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांना कळविण्याबाबतचे आवाहन करण्यात आले आहे. त्याचबरोबर विभागातील एकूण २६८ अंगणवाड्या, ६९ शाळांशी समन्वय साधून त्यांना गोवरविरोधी मोहिमेमध्ये सहभागी करून घेतले आहे. 

कोविड-१९ काळामध्ये प्रत्येक विभाग कार्यालयामध्ये वॉर रूमचा उपयोग गोवर आजाराबाबतची माहिती, लसीकरणाची माहिती त्याचप्रमाणे कोणत्याही रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्याची गरज असल्यास त्यांना रुग्णालयाशी संपर्क साधून देणे व त्याचप्रमाणे रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे इत्यादी कामे केली जात आहे. जी/उत्तर विभागातर्फे धारावी तसेच परिसरातील तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे कि, आपल्या कुटुंबातील ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील बालकांची गोवर लस राहिली असल्यास ती तातडीने द्यावी व त्याचप्रमाणे ताप अंगावर पुरळ यांसारखी लक्षणे असणाऱ्या बालकांना 'अ' जीवनसत्व द्यावे जेणेकरून प्रतिकार शक्ती कमी होणे, अतिसार, न्युमोनिया असे गंभीर आजार उद्भवण्याचा धोका कमी होईल व त्याकरिता महापालिका कर्मचारी यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: measles outbreak health system ready in mumbai dharavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई