वडिलांच्या दक्षतेमुळे पकडला गेला एमडीचा विक्रेता

By Admin | Updated: January 18, 2015 23:31 IST2015-01-18T23:31:53+5:302015-01-18T23:31:53+5:30

एरव्ही, आपले पाल्य व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याला रागावून तो विषय तिथेच सोडणारे अनेक पालक आहेत

MD Dealer was caught due to father's vigilance | वडिलांच्या दक्षतेमुळे पकडला गेला एमडीचा विक्रेता

वडिलांच्या दक्षतेमुळे पकडला गेला एमडीचा विक्रेता

ठाणे : एरव्ही, आपले पाल्य व्यसनाच्या आहारी गेला असेल तर त्याला रागावून तो विषय तिथेच सोडणारे अनेक पालक आहेत. परंतु, आपली मुलगी एमडी पावडरच्या आहारी गेल्याच्या संशयानंतर थेट पोलीस ठाणे गाठून याप्रकरणाच्या सखोल तपासाला पोलीसांना मदत करुन एमडी पावडरच्या विक्रेत्याला गजाआड करण्याची लाख मोलाची कामगिरी तिच्या पित्याने बजावली आहे.
वागळे इस्टेट परिसरात राहणारी दहावीतील सुमन पाटील (नाव बदलले आहे) या मुलीच्या वागण्यात गेल्या काही दिवसांपासून बदल जाणवत असल्याचे तिच्या वडीलांच्या निदर्शनास आले.
विस्फारलेले डोळे, विचित्र वागण्याने त्यांचा संशय बळावल्यानंतर त्यांनी तिला विश्वासात घेऊन विचारणा केली. तेंव्हा आपण एक पावडर वापरत असल्याची कबुली तिने दिल्यानंतर त्यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांच्याकडे तिला आणले. चौकशीनंतर धर्माधिकारी यांच्यासह उपनिरीक्षक अमोल वालझडे यांच्या पथकाने लावलेल्या सापळ्यात सुधीर निशाद (२९) या प्लंबरला पकडण्यात आले. तोही एमडीच्या आहारी गेला आहे. त्याने ५०० रुपयांत १ ग्रॅम पावडर ५ ते ६ वेळा तिला विकली होती. तो ही पावडर मुंब्य्रातून विकत घेत होता. असेही निष्पन्न झाले. आधी ही पावडर या मुलीला फुकट देण्यात आली व तिला त्याचे व्यसन लागल्यावर तिने ही पावडर मिळविण्यासाठी घरातून पैसेही चोरले होते. कुटुंबाची इभ्रत जायला नको म्हणून बरेच पालक अशा प्रकारांची वाच्यताही करीत नाहीत. या मुलीच्या कर्तव्यकठोर वडिलांमुळे पुढे होणारा मोठा अनर्थ टळल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: MD Dealer was caught due to father's vigilance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.