एमटीएचएल प्रकल्पाला एमसीझेडएमएचा हिरवा कंदील
By Admin | Updated: November 21, 2015 02:42 IST2015-11-21T02:42:49+5:302015-11-21T02:42:49+5:30
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड (एमटीएचएल) प्रकल्पाला महाराष्ट्र सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) हिरवा कंदील दिला आहे.

एमटीएचएल प्रकल्पाला एमसीझेडएमएचा हिरवा कंदील
मुंबई : गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक रोड (एमटीएचएल) प्रकल्पाला महाराष्ट्र सागरी क्षेत्र किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) हिरवा कंदील दिला आहे. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण आणि वन विभागाची परवानगी आवश्यक असून या विभागाची परवानगी मिळताच या प्रकल्पाला गती येणार आहे.
एमएमआरडीएमार्फत शिवडी ते न्हावा शेवा हा २२ किलोमीटर लांबीचा सागरी पूल बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मुंबई ते प्रस्तावित नवी मुंबई विमानतळापर्यंत जलद प्रवास शक्य होईल. या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण विभागाने २00३ मध्ये परवानगी दिली होती. या प्रकल्पामुळे समुद्र किनाऱ्यावर परिणाम होईल, असा आदेश देत राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण विभागाने दिलेली परवानगी फेटाळली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर महिन्यात केलेल्या जपान दौऱ्यावेळी जपान इंटरनॅशनल को-आॅपरेशन एजन्सीने (जायका) एमटीएचएल प्रकल्पाला अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार जायका या प्रकल्पाला ८0 टक्के रक्कम देणार आहे. या प्रकल्पासाठी अंदाजे ११ हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.