Join us  

एमसीएकडे मुंबई पोलिसांची २१.३४ कोटीची थकबाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 9:01 PM

७ वर्षापासून क्रिकेट सामन्यांचा बंदोबस्ताचे शुल्कसंपलेल्या आयपीएल सामन्याचे शुल्क अनिश्चित;माहिती अधिकारातून उघड

मुंबई - मुंबईत गेल्या ७ वर्षापासून झालेल्या विविध क्रिकेट सामन्यातील पोलीस बंदोबस्तापोटीचे तब्बल २१कोटी ३४ लाखाचे शुल्क अद्याप थकीत आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने (एमसीए) विविक कारणास्तव मुंबई पोलिसांचे बील थकविले आहे. त्याचप्रमाणे नुकत्याच संपलेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांना पुरविण्यात आलेल्या बंदोबस्ताचे दर शासनाकडून अद्याप निश्चित केलेले नाही.त्यामुळे या सामन्यांचे बील बनविण्यात आलेले नाहीत.माहिती अधिकार कायद्यातून मिळालेल्या माहितीतून ही बाब उघड झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी १ जानेवारी २०११ पासून मुंबईतील क्रिकेट सामन्यासाठी पुरविण्यात आलेला बंदोबस्त व शुल्काची माहिती मागविली होती. त्याबाबत बंदोबस्त शाखेकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१३मध्ये २६ जानेवारी ते २८ फेब्रुवारी कालावधीत महिला वर्ल्ड कप स्पर्धाच्या सामन्याचे शुल्क ६ कोटी ६६ लाख २२०८८ रुपये इतके होते. व्याजासह ही रक्कम १० कोटी ५५ लाख ३२,१९७ रुपये इतकी झाली आहे. २५, ३० व ३१ आॅक्टोंबर २०१५ मध्ये झालेल्या एक दिवसीय सामन्याचे बंदोबस्तापोटी ८३ लाख ५२ हजार ८९ रुपये शुल्क झाले होते. व्याजासह ती रक्कम आता १ कोटी १२ लाख २६,१६४ इतकी झाली आहे. ८ ते १२ डिसेंबर २०१६ या कालावधीतील कसोटी सामन्याचे ५० लाखाचे शुल्क आता व्याजसह ५५ लाख १८,३४४ इतके झाले आहे. २२ आॅक्टोबर २०१७ च्या एक दिवसीय सामन्याचे ६६ लाखाचे भाडे व्याजासह ७३ लाख ९८,६४१ इतके झाले आहे. त्याच वर्षातील २४ डिसेंबरला झालेल्या टेव्टी-२० सामन्याचे शुल्क व्याजासह ७२ लाख ७९,२५० इतके झाले आहे. २०१७ मधी, एप्रिल व मे महिन्यात झालेल्या आयपीएल सामान्याचे बंदोबस्तासाठीच्या ४ कोटी ६२ लाखापैकी अद्याप ६६ लाखाची थकबाकी आहे. व्याजासह ही रक्कम ७६ लाख ८४,७१० इतकी झाली आहे. २०१६ विश्वचषक टी-२० क्रिकेट सामन्याचे ३ कोटी ६० लाख शुल्क व्याजासह ४ कोटी ६२ लाख ४०३९९ इतकी झाली आहे. २०१८ वर्षातील आयपीएल सामन्याचे एकूण ४ कोटी ९० लाखा पैकी अद्याप १ कोटी ४० लाख बाकी असून व्याजासह ही रक्कम १ कोटी ४८ लाख ८६,६६७ इतकी झाली आहे. गेल्यावर्षी २९ आॅक्टोबरला झालेल्या एकदिवसीय सामन्याचे ७५ लाखाची थकबाकी व्याजासह ७६ लाख ७८,१२५ इतकी झाली आहे.पोलीस बंदोबस्ताच्या बळावर अफाट नफा कमविणा-या मुंबई क्रिकेट एसोसिएशनने बंदोबस्त शुल्क ताबडतोब अदा करणे आवश्यक होते. सशस्त्र दलाच्या निष्काळजीपणामुळे शुल्क वसूल झालेले नसून पोलीस आयुक्तांनी जबाबदार अधिकारी वर्गावर नियमाप्रमाणे कार्यवाही करावी, अशी मागणी अनिल गलगली यांनी केली आहे. सामना संपताच त्याचे शुल्क वसूल करावे किंवा क्रिकेट स्पर्धा आयोजकांकडून आगावू स्वरुपात जमा करुन घ्यावे, त्यामुळे वसुलीचा मनस्ताप टळेल, असे त्यांनी नमूद केले आहे.

बंदोबस्ताचे नवीन शुल्क अद्याप अनिश्चितगृह विभागाने क्रिकेट सामन्यासाठीच्या बंदोबस्ताच्या शुल्काची निश्चिती ३१ मार्च २०१९ पर्यत केलेली होती. त्यानंतर नवीन शुल्काचे आदेश अद्याप काढण्यात आले नसल्याने यावर्षी झालेल्या आयपीएल क्रिकेट सामन्यांचे बील बनविण्यात आलेले नाही. त्याची निश्चित झाल्यानंतर एमसीएकडे नवीन दराप्रमाणे बील पाठविण्यात येणार असल्याचे बंदोबस्त शाखेने नमूद केले आहे.

टॅग्स :पोलिसमाहिती अधिकार कार्यकर्तामुंबई