Join us  

एमबीए प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; विद्यार्थी, पालकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2019 5:45 AM

सीईटी सेलच्या तंत्रशिक्षण विभागाची माहिती : यंदाच्या शैक्षणिक वर्षात प्रवेशप्रक्रिया सर्वाधिक लांबल्याची शैक्षणिक वतुर्ळात चर्चा

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केलेल्या एमबीए प्रवेश प्रक्रियेला हिरवा कंदील दिल्यानंतर मंगळवारी प्रवेश प्रक्रियेचे सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर जाहीर झाले. ही माहिती सीईटी सेलच्या तंत्रशिक्षण विभागाचे परीक्षा समन्वयक सुभाष महाजन यांनी दिली. विद्यार्थ्यांनी सुधारित वेळापत्रकाप्रमाणे प्रवेशाची कार्यवाही दिलेल्या मुदतीत करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

एमबीए प्रवेश प्रक्रियेबाबत डीटीई आणि सीईटीकडून अपेक्षित माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी आणि पालक त्रासले होते. आता सुधारित वेळापत्रकामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी एमबीए प्रवेशप्रक्रिया सर्वाधिक लांबल्याची चर्चा शैक्षणिक वतुर्ळात सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, दोन आठवड्यांच्या आत ही प्रवेश प्रक्रिया पार पाडायची आहे. त्यानंतर, विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी एक आठवड्याचा अतिरिक्त वेळ देता येईल, असेही न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे मंगळवारी कॅप राउंड १च्या जागांचे सुधारित वाटप आणि त्याची यादी जाहीर करण्यात आली. त्यानुसार, पुढील प्रवेश प्रक्रिया सुधारित वेळापत्रकानुसार होईल. ९ सप्टेंबरला कॅप राउंड २ ची तर १२ सप्टेंबरला कॅप राउंड ३ची यादी जाहीर करण्यात येईल.विद्यार्थ्यांनी अलॉटमेंटप्रमाणे एआरसी केंद्रांमध्ये जाऊन प्रवेश निश्चित करायचे आहेत. १६ सप्टेंबर रोजी शैक्षणिक संस्थांनी या शैक्षणिक वर्षासाठीच्या उपक्रमांना सुरुवात करावी, असे निर्देशही या अंतर्गत देण्यात आले आहेत. एमबीए प्रवेशाचे सविस्तर सुधारित वेळापत्रक सीईटी सेलच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबईतील जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट स्टडीजचे (जेबीआयएमएस) प्रवेश स्वायत्तता दर्जाप्रमाणे करण्याच्या मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या संस्थेतील प्रवेश प्रक्रिया आता स्वायत्तता दर्जानुसारच राबवण्यात येणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने पूर्वी ‘अस्वायत्त’ दर्जाप्रमाणे ‘जेबीआयएमएस’ संस्थेत झालेले प्रवेश रद्द केले होते. त्या विरोधात प्रवेश झालेल्या ३९ विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. दाखल करण्यात आलेल्या या याचिकेवरील सुनावणी २८ आॅगस्ट रोजी झाली. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला होता. हा निर्णय सोमवारी जाहीर करण्यात आला. या विद्यार्थ्यांची मागणी अमान्य करत, सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाचाच निर्णय कायम ठेवला आहे.गुणवत्ता यादीनुसारच होणार प्रवेश प्रक्रियासर्वोच्च न्यायालयाने तंत्रशिक्षण महामंडळ (डीटीई) आणि सीईटी सेलने जाहीर केलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता यादीनुसारच प्रवेश प्रक्रिया पार पाडावी, असा आदेश दिला आहे. जेबीआयएमएसची प्रवेश प्रक्रिया ही मुंबई विद्यापीठांतर्गत येणारी स्वायत्त संस्था समजूनच पार पाडली जाईल. दरम्यान, केवळ २०१९-२० या शैक्षणिक वर्षातील एमबीएची प्रवेशप्रक्रिया आणखी रेंगाळू नये, यासाठीच दिल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :न्यायालयसर्वोच्च न्यायालयमहाविद्यालय