Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूरमुक्त मुंबईला महापौरांचे प्राधान्य; पावसाळ्यापूर्वी नालेसफाई, 'ब्रिमस्टोवॅड २' साठी आग्रही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 13:11 IST

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून काम सुरू केले आहे.

मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी ११ फेब्रुवारीला पदभार स्वीकारल्यानंतर मुंबईच्या विकासासाठी १०० दिवसांचा प्राधान्यक्रम आराखडा तयार करून काम सुरू केले आहे. मुंबई पूरमुक्त करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई करण्याला त्यांनी प्राधान्य दिले आहे. ठिकठिकाणी पाणी साचून मुंबई तुंबू नये, यासाठी 'ब्रिमस्टोवॅड प्रकल्प २' राबविणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

१०० दिवसांचा प्राधान्यक्रम कार्यक्रमात त्या महत्त्वाच्या २१ प्रकल्पांसाठी आग्रही राहणार असून, त्यातील सात प्रकल्पांचे काम त्यांनी सुरू केले आहे.

महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर तावडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रशासन अधिक परिणामकारक, पारदर्शक आणि गतिमान करण्याचा निर्धार व्यक्त केला.

दरवर्षी पावसाळ्यात मुंबईत ठिकठिकाणी पाणी साचते. यंदा ही परिस्थिती उद्भवू नये, यासाठी पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्यावर महापौरांचा भर आहे.

महापौरपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महिनाभरातच काही महत्त्वाच्या उपक्रमांची त्यांनी कार्यवाही सुरू केली आहे. त्यात पालिकेच्या सर्व सामग्रीची खरेदी 'जेम' पोर्टलमार्फत करण्याची प्रक्रिया, मुंबई अधिक स्वच्छ व सुंदर करण्यासाठी समुदाय स्तरावर स्वच्छता स्पर्धा घेणे, पावसाळ्यापूर्वी १०० टक्के नालेसफाई पूर्ण करण्यासाठी विशेष मोहीम, तसेच पाणी तुंबण्याच्या समस्येवर उपाय म्हणून 'ब्रिमस्टोवॅड २' राबविणे. त्यासाठी आयआयटी मुंबईच्या अभ्यास गटाची नेमणूक करणे यांचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले.

फेरीवाल्यांचे पुनर्वसन; ओळखपत्राचे वितरण

१. पात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनासाठी हॉकिंग झोन निर्माण करण्यासाठी फेरीवाला समिती नेमण्याची प्रक्रिया तसेच सर्व पात्र फेरीवाल्यांना क्यूआर कोडसह परवाना व ओळखपत्र देण्यावर भर आहे.

२. १४ वर्षे वयोगटांतील मुलींसाठी गर्भाशयमुख कर्करोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम प्रारंभ, मुंबई-नवी मुंबईदरम्यान प्रवेशद्वाराची उभारणी, राणीच्या बागेत आशियाई सिंह उपलब्ध करून देण्यासाठी गुजरात राज्याकडे केलेल्या पाठपुराव्याची कृती आराखड्यात समावेश असल्याचे महापौर म्हणाल्या.

English
हिंदी सारांश
Web Title : Mayor Prioritizes Flood-Free Mumbai: Drainage Cleaning, 'Brimstowad 2' Pushed

Web Summary : Mayor emphasizes pre-monsoon drainage cleaning and 'Brimstowad 2' project for flood prevention. A 100-day plan focuses on 21 projects, including community cleanliness drives, 'GEM' portal procurement, hawker rehabilitation, and cervical cancer vaccination for girls. The aim is efficient, transparent, and faster administration to meet citizens' expectations.
टॅग्स :मुंबई