Join us

दिव्याखाली अंधार! 'नो पार्किंग'च्या फलकासमोर महापौरांची गाडी पार्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2019 14:48 IST

पालिका कारवाई करत असताना महापौरांकडून नियमांचं सर्रास उल्लंघन 

मुंबई: शहराचे प्रथम नागरिक असलेल्या महापौरांनीच नियम धाब्यावर बसवल्याचा प्रकार घडला आहे. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांची गाडी 'नो पार्किंग' बोर्डच्या अगदी समोर उभी असल्याचं दिसून येत आहे. महापौर विलेपार्ल्यात गेले असताना हा प्रकार घडला. त्यामुळे सर्वसामान्यांना लागू असणारे नियम उच्चपदस्थांना लागू होत नाहीत का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शनिवारी महाडेश्वर विलेपार्ल्यात होते. त्यावेळी त्यांची कार एका हॉटेलसमोरच्या रस्त्यावर उभी होती. विशेष म्हणजे त्या ठिकाणी नो पार्किंगचा बोर्ड अगदी स्पष्ट दिसत होता. या भागातील रस्ते अतिशय अरुंद आहेत. मात्र तरीही महापौरांची कार या भागात उभी होती. रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या वाहनांवर गेल्या आठवड्याभरापासून पालिकेनं मोठी कारवाई सुरू केली आहे. मात्र असं असताना महापौरांचीच कार 'नो पार्किंग'मध्ये दिसल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. महापौर गेलेल्या भागात वाहनतळ नसल्याचं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं. महापौरांची कार नो पार्किंग झोनमध्ये उभी करायला नको होती, असंदेखील अधिकारी म्हणाला. शनिवारी विलेपार्ल्यातील हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, असं महाडेश्वर म्हणाले. 'मी कारमधून उतरुन हॉटेलमध्ये गेलो. त्यावेळी चालकानं कार नेमकी कुठे उभी केली याची मला कल्पना नव्हती. पण कायद्यासमोर सगळे समान असतात आणि प्रत्येकानं नियम पाळायलायच हवेत, असं मला वाटतं. असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून मी माझ्या कर्मचारी वर्गाला नियमांचं पालन करण्याच्या सूचना करणार आहे,' असं महाडेश्वर यांनी सांगितलं.  

टॅग्स :महापौरमुंबई