महापौरपदावर आज शिक्कामोर्तब !

By Admin | Updated: May 8, 2015 23:22 IST2015-05-08T23:22:08+5:302015-05-08T23:22:08+5:30

महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदावर शनिवारी शिक्कामोर्तब होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासह सभागृहनेतेपदही निश्चित होणार आहे

Mayor postmaster today! | महापौरपदावर आज शिक्कामोर्तब !

महापौरपदावर आज शिक्कामोर्तब !

नवी मुंबई : महापालिकेच्या महापौर व उपमहापौरपदावर शनिवारी शिक्कामोर्तब होणार आहे. विरोधी पक्षनेतेपदासह सभागृहनेतेपदही निश्चित होणार आहे. सर्वाधिक उत्सुकता स्वीकृत नगरसेवकपदाविषयी आहे. ५ जागांसाठी १० अर्ज आले असून कोणाचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या १२ व्या महापौर व उपमहापौरपदाची निवड पालिकेच्या मुख्यालयामध्ये ९ मे रोजी ११ वाजता होणार आहे. काँगे्रस, राष्ट्रवादी व अपक्ष आघाडीने महापौरपदासाठी सुधाकर सोनावणे यांचा तर उपमहापौरपदासाठी अविनाश लाड यांचा अर्ज भरला आहे. शिवसेना-भाजपा युतीने महापौरपदासाठी संजू वाडे व उपमहापौरपदासाठी उज्ज्वला झंझाड यांचा अर्ज भरला आहे. आघाडीकडे ६७ मते तर युतीकडे ४४ मते आहेत. शिवसेना नेते वारंवार चमत्कार होण्याची भाषा बोलत आहेत. फोडाफोडीसाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. यामुळे महापौर निवडणूक बहुमताच्या आकड्यांनुसार होणार की युतीचे नेते आयत्या वेळी चमत्कार करणार याविषयी तर्कवितर्क लढविले जात आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांची धावपळ वाढविण्यासाठीच फोडाफोडीच्या चर्चा सुरू आहेत. सर्वच पक्षांनी त्यांच्या नगरसेवकांवर लक्ष ठेवले आहे. पक्षाचा व्हिप जारी केला आहे. सभागृह नेतेपदासाठी जे. डी. सुतार यांचे नाव निश्चित समजले जात आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेच्या विजय चौगुले यांचे नाव निश्चित समजले जात आहे.
महापौरपदापेक्षा स्वीकृत नगरसेवकांविषयी उत्सुकता जास्त आहे. संख्याबळाप्रमाणे आघाडीचे तीन सदस्य निवडले जाणार आहेत. परंतु राष्ट्रवादीने अनंत सुतार, साबू डॅनियल, सुरज पाटील व अपक्ष घनश्याम मढवी यांचा अर्ज भरला आहे. सुतार यांचे नाव निश्चित आहे. उर्वरित तिघांपैकी कोणाचा पत्ता कट होणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. साबू डॅनियल यांची निवड झाली तर सलग तीन वेळा स्वीकृत नगरसेवक होणारे ते एकमेव सदस्य असणार आहेत. काँगे्रसचे अनिल कौशिक यांचा अर्ज कायम राहणार का, याविषयी उत्सुकता आहे. शिवसेनेने राजेश शिंदे, राजेश आव्हाड, मनोज हळदणकर व विलास लोके यांचा अर्ज भरला आहे. यापैकी आव्हाड व शिंदे यांचे नाव निश्चित समजले जात आहे. उर्वरित दोघांना माघार घ्यावी लागणार की त्यांच्यापैकी अजून कोणाची लॉटरी लागणार हे शनिवारीच स्पष्ट होणार आहे. भाजपाच्या दिलीप तिडके यांनीही अर्ज भरला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Mayor postmaster today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.