मयांक गांधींची ‘ब्लॉग’पाखड
By Admin | Updated: March 8, 2015 02:36 IST2015-03-08T02:36:34+5:302015-03-08T02:36:34+5:30
आम आदमी पक्षातील सत्तासंघर्षाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. पक्षाचे मुंबईतील नेते मयांक गांधी यांनी आणखी एक ब्लॉग लिहून पक्षातील सत्तासंघर्ष उघड केला आहे.

मयांक गांधींची ‘ब्लॉग’पाखड
मुंबई : आम आदमी पक्षातील सत्तासंघर्षाचे पडसाद महाराष्ट्रातही उमटू लागले आहेत. पक्षाचे मुंबईतील नेते मयांक गांधी यांनी आणखी एक ब्लॉग लिहून पक्षातील सत्तासंघर्ष उघड केला आहे. आपचे दिल्लीतील काही नेते माझ्या विरोधात षड्यंत्र रचत आहेत. मला आप व केजरीवालविरोधी ठरविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप गांधी यांनी केला आहे.
‘सेकंड नोट अगेन फ्रॉम हार्ट’ या शीर्षकाने लिहिलेल्या लेखात गांधी यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतील वृत्तांत जाहीर करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार केला. दिल्लीतील आशिष खेतान आणि अन्य काही नेते माझ्याविरोधात काम करीत आहेत. राज्यातील काही नाराजांनीही माझ्याविरुद्ध मुलाखती द्यायला सुरुवात केली आहे. जुनी प्रकरणे उकरून काढत माझ्या विरोधात वातावरण बनविण्यात येत आहे. दिल्लीतील या नेत्यांनी मला बीबीएम ग्रुपमधून काढून टाकले आहे, असा दावा गांधी यांनी ब्लॉगवर केला आहे. मी पक्षाला सोडचिठ्ठी देत नाही तोपर्यंत मला अपमानित करण्याचा कार्यक्रम सुरू राहील. योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांच्याविरुद्ध अशीच रणनीती अंमलात आणली होती, असा आरोप गांधी यांनी केला. योगेंद्र यादव आणि भूषण यांची राजकीय व्यवहार समितीतून हकालपट्टी झाल्यावर ब्लॉगच्या माध्यमातून मयांक गांधी यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला होता. दुसऱ्या ब्लॉगमध्ये मात्र त्यांनी आपण कोणा एका व्यक्ती अथवा नेतृत्वाविरोधात नसल्याचे स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)