माथेरानच्या मिनी बसला नवा साज
By Admin | Updated: July 31, 2015 23:05 IST2015-07-31T23:05:55+5:302015-07-31T23:05:55+5:30
माथेरान घाटात सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या मिनी बससेवेला आता नवा साज लाभणार आहे. सध्या माथेरान घाटात हिरव्या रंगाच्या मिनी बस धावतात.

माथेरानच्या मिनी बसला नवा साज
कर्जत : माथेरान घाटात सुरू असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या मिनी बससेवेला आता नवा साज लाभणार आहे. सध्या माथेरान घाटात हिरव्या रंगाच्या मिनी बस धावतात. मात्र अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बससेवेवर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेता या मार्गावर नवीन बनावटीच्या गाड्या आणण्याची मागणी सातत्याने केली जात होती. त्यानुसार कर्जत ते माथेरान या मार्गावर आता नवीन पद्धतीच्या बस गाड्या धावणार असून त्या दृष्टीने एका गाडीची माथेरान घाटात चाचणी देखील झाल्याने माथेरान मिनी बससेवेला आता नवा साज लाभणार आहे.
या मार्गावर नवीन बसेस उपलब्ध व्हाव्यात यासाठी नगरसेवक दिनेश सुतार, राजेश दळवी, मिताली धनावडे यांच्यासह अनेक विद्यार्थी आणि नगरसेवकांनी कर्जत डेपोत उपोषण केले होते. आमदार सुरेश लाड यांनी तारांकित प्रश्नाद्वारे हा विषय विधानसभेत उपस्थित केला होता. माथेरानमधील अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक संस्थांनी देखील याबाबत वेळोवेळी निवेदनाद्वारे या प्रश्नाकडे लक्ष वेधले होते. याचा परिणाम म्हणून आता या नवीन बसगाड्या माथेरान घाटात धावणार आहेत .
नुकतीच नवीन बसची चाचणी झाली त्यावेळी माजी नगरसेवक दयानंद डोईफोडे, नगरसेवक शिवाजी शिंदे, परिवहन मंडळाचे पुणे येथील उपमुख्य अभियंता यू. ए. काटे, एच. एन. भालेराव प्रादेशिक अभियंता मुंबई आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
प्रवाशांना दिलासा
- हिमाचल प्रदेशच्या डोंगरदऱ्यात या बसेस धावत असून ३८ प्रवासी या बसमधून प्रवास करू शकतील. तट कंपनीने या गाड्या बनविल्या असून त्या माथेरान घाटात सुरु झाल्यास माथेरानच्या मिनी बससेवेला नवा साज चढून, प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल.