Join us  

बाळाचा जीव धोक्यात टाकून भरला प्रसूती रजा बॉण्ड; वर्ष उलटले तरी पगार दिला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2020 3:46 AM

पालिकेच्या जी उत्तर विभागात आरोग्य प्रचारक म्हणूनच सदर महिला काम करतात. त्या प्रसूती रजेवर असतानाच प्रत्येक महिन्याला त्यांचा पगार त्यांना देणे नवीन नियमांनुसार बंधनकारक होते.

गौरी टेंबकर-कलगुटकर मुंबई : ‘प्रसूती रजा’ पगारासाठी बॉण्ड भरायला महिन्याभराच्या दूध पिणाऱ्या बाळाला सोडून मी कार्यालयात गेले. मात्र वर्ष उलटूनही तो पगार मला अद्याप देण्यात आलेला नसल्याची व्यथा महिला क्षयरोग कंत्राटी कर्मचाऱ्याने मांडली. टीबी हा कोरोनापेक्षाही जीवघेणा आजार असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. मात्र तरीही हा धोका पत्करून सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची किंमत प्रशासनाला कळलेली नसल्याने आता सामूहिकरीत्या ‘कामबंद’ आंदोलनाचा इशारा मुंबई जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या कंत्राटी कामगारांकडून देण्यात आला आहे.

पालिकेच्या जी उत्तर विभागात आरोग्य प्रचारक म्हणूनच सदर महिला काम करतात. त्या प्रसूती रजेवर असतानाच प्रत्येक महिन्याला त्यांचा पगार त्यांना देणे नवीन नियमांनुसार बंधनकारक होते. मात्र बाळ जन्माला आल्याच्या महिन्याभरानंतर एक बॉण्ड भरण्यासाठी त्यांना कार्यालयात जावे लागले. मुलाला इन्फेक्शन होईल याची कल्पना असतानाही पगार मिळाला तर बाळाच्या संगोपनासाठी त्याचा हातभार लागेल, या आशेने या महिलेने बॉण्ड भरून दिला. मात्र त्या गोष्टीला आज वर्ष उलटले आहे, परंतु त्यांना प्रसूती रजेचा पगार देण्यात आलेला नाही. तरीही कोरोना काळातही त्या स्वत:चे कर्तव्य चोख बजावत आहेत. तर परळच्या विभागात वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ असलेल्या महिला कर्मचारी या नुकत्याच प्रसूती रजा पूर्ण करून कर्तव्यावर परतल्या आहेत. ‘बाळ लहान असल्याने त्याला असलेल्या टीबी या आजाराचा धोका लक्षात घेता मी तातडीने कामावर आले नाही. मात्र ‘वर्क फ्रॉम होम’ करत वेळच्या वेळी सर्व रिपोर्टिंग करत होते. असे असूनही मला गैरहजर दाखवत माझा पगार कापण्यात आला जे अन्यायकारण आहे. स्त्रियांना कामासाठी दुचाकी वाहन मिळणार, पगार वाढणार अशी अनेक आश्वासने देण्यात आली आहेत. मात्र यापैकी एकाचीही पूर्तता करण्यात आली नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.टीबी कर्मचारीही माणूस असल्याचा विसर?टीबी कर्मचारी हाही माणूस आहे याचा प्रशासनाला विसर पडलेला दिसत आहे. २०१३ पासून आम्हाला बेसिक पगारवाढ देण्यात आलेली नाही, मात्र कामे वाढली आहेत. एचआर सिस्टीम लागू नाही. त्यामुळे वर्कलोडनुसार स्टाफ उपलब्ध होत नाही.माझ्यामुळे ५ कुटुंबीयांना कोरोना!‘कोरोनाच्या रुग्णांची सेवा करताना मला त्याची लागण झाली. माझ्या कुटुंबातील पाच जण पॉझिटिव्ह आले. उपचाराचा खर्च मलाच करावा लागला. त्यामुळे आमची मोफत कोरोना चाचणी करण्यात यावी आणि अन्य आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणे कंत्राटी कामगारांनाही क्वारंटाइनची सुविधा द्यावी, जेणेकरून त्यांचे कुटुंब तरी सुरक्षित राहील.ऑल रिस्क अलाऊन्स आणि विमा संरक्षण...‘आम्हाला आहार भत्त्याचे गाजर गेल्या तीन ते चार वर्षांपासून दाखवले जात आहे. मात्र तो अद्याप मिळाला नाही. तसेच रिस्क अलाऊन्स म्हणून ३०० रुपये तसेच ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण आम्हाला दिले जावे. वाहतुकीची सोय करण्यात यावी. तसेच पीपीई किट, मास्कसारख्या सोयी पुरविण्यात याव्यात. शिवाय आमच्यापैकी कोणी संक्रमित आढळल्यास योग्य त्या रुग्णालयात उपचारांची सोय करण्यात यावी.’

टॅग्स :महाराष्ट्रात कोरोना व्हायरस