मासुंदा तलावाला वारागंनासह फेरीवाल्यांचा विळखा
By Admin | Updated: February 15, 2015 23:02 IST2015-02-15T23:02:52+5:302015-02-15T23:02:52+5:30
ठाणे शहरातील चौपाटी वाठाणेकरांची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाला सध्या ग्रहण लागले आहे. या तलावाच्या चोहोबाजूने

मासुंदा तलावाला वारागंनासह फेरीवाल्यांचा विळखा
अजित मांडके, ठाणे
ठाणे शहरातील चौपाटी वाठाणेकरांची शान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाला सध्या ग्रहण लागले आहे. या तलावाच्या चोहोबाजूने बसविलेल्या लाद्या निखळल्या असून चारही बाजूने या तलावाला वारंगंनासह फेरीवाल्यांचा विळखा आहे. विशेष म्हणजे याच फेरीवाल्यांकडून खाल्लेल्या पदार्थांचे तेलाचे तवंगआणि इतर पदार्थ हे तलावात टाकले जात असल्याने तलावातील जलचर प्राण्यांचेही भवितव्य धोक्यात सापडले आहे. त्यातही याच परिसरात जिजामाता आणि शिवाजी भाजीमंडई आहेत. परंतु त्यांना देखील अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा बसला आहे. त्यामुळे या भागात सतत वाहतूककोंडी होत आहे.
ठाणे महापालिकेच्या प्रभाग क्र. ४० मध्ये मासुंदा तलाव, जिजामाता आणि शिवाजी मंडई, मुख्य बाजारपेठ, चंदनवाडी, शिवाजी मैदान, दगडी शाळेचा काही भाग, धोबी आळी, जोंधळी बाग, हंसनगरचा काही भाग, मखमली तलाव, अल्मेडा रोड आदींचा यात समावेश असून या प्रभागाची लोकसंख्या २२ हजारांच्या आसपास आहे. झोपडपट्टीचे प्रमाण हे याठिकाणी केवळ १० टक्यांच्या आसपास आहे. अनधिकृत बांधकामे २५ टक्के आहेत. परंतु उर्वरित प्रभाग हा सर्व सोयीसुविधांनी फुललेला आहे. नाले, गटार, पायवाटा, रस्ते, पाणी यांचे योग्य प्रकारचे नियोजन या प्रभागात आहे. त्यामुळे येथील रहिवाशांना मुलभूत समस्या जरी भेडसावित नसल्या तरी ठाणेकरांचा मानबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मासुंदा तलावाला लागलेली उतरती कळा यामुळे ते अधिक चितांग्रस्त आहेत. ठाणे स्टेशन पासून हाकेच्या अतंरावर हा प्रभाग आहे. या प्रभागात मांसुदा आणि मखमली हे दोन तलाव येतात. परंतु सध्या मासुंदा तलावाची अवस्था ही दयनीय झाली असून संध्याकाळी सहा नंतर येथे वारांगनांचा वावर सुरु झाला आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबासह फिरण्यास येणाऱ्यांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय तलावाच्या चोहोबाजूंनी बसविलेल्या लाद्यादेखील निखळल्या आहेत. त्यातही, पाणीपुरी, चायनीज, पावभाजी या फेरीवाल्यांचा गराडा या तलावाला बसला आहे. त्यामुळे तलावाचे सौंदर्य लोप पावत आहे. विशेष म्हणजे या फेरीवाल्यांकडून निर्माण होणारी घाण ही तलावात टाकली जात असल्याचे मत येथील रहिवासी व्यक्त करतात. त्यामुळे तलावाला दुर्गंधी येऊ लागली आहे. तसेच त्यातील जलचर प्राण्यांचेही भवितव्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे येथे असलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोरील परिसराचे सुशोभिकरण करण्यात आले होते. परंतु पालिकेला त्याची निगा देखभाल राखता न आल्याने, त्यालादेखील उतरती कळा आली आहे. तसेच चारही बाजूने उंदीर, घुशींनी तलाव पोखरण्यास सुरवात केली आहे.
दुसरीकडे येथे मुख्य बाजारपेठ असून येथे फिरतांना मात्र गर्दी आणि गोंधळ अशीच काहीशी परिस्थिती या भागात असते.येथे असलेल्या परिवहनच्या बसथांब्यालाही फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. परंतु या संदर्भात तक्रारी केल्या तर युनियनवाल्यांच्या त्रासाला सामोेरे जावे लागत असल्याचे मत येथील रहिवासी व्यक्त करतात. गांधी उद्यानाचे अद्यापही खेळणी बसविण्यात आलेली नाहीत.