Join us  

'मस्तवाल विधानाचा निषेध, छत्रपतींच्या घराण्याचा अपमान सहन करणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 6:40 PM

उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून राऊत यांना इशारा देण्यात आला आहे

 मुंबई - शिवसेनेची स्थापना करताना शिवरायांच्या वंशजांना विचारले होते का? शिवसेनेचे नाव बदलून ठाकरेसेना करा असा सल्ला देणाऱ्या भाजपाचे नेते उदयनराजे भोसले यांना शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या, असे आव्हान संजय राऊत यांनी उदयनराजेंना दिले आहे. संजय राऊत यांच्या या विधानावर आता भाजपा नेत्यांनी संजय राऊत यांना लक्ष्य केले आहे. तसेच, सकल मराठा समाजाकडूनही संजय राऊतांचा निषेध नोंदविण्यात येत आहे. 

उदयनराजेंवरील वक्तव्यामुळे मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून राऊत यांना इशारा देण्यात आला आहे. तुम्ही राजकारणात कोणाचे नाव घेऊ आहात हे तपासा. छत्रपतींच्या घराण्याविषयी चुकीचे वक्तव्य केल्यास त्याला सोडणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबा पाटील यांनी संजय राऊत यांना दिला. त्यानंतर, आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही परिपत्रक जारी करत छपत्रतींच्या घराण्यासंदर्भात अपशब्द कदापि खपवून घेणार नाही, असे म्हटले आहे. 

''छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून, महाराजांची साताऱ्याची गादी संपूर्ण महाराष्ट्रासाठी सदैव पूजनीय आहे. त्यांच्या घराण्याविषयी एकही अपशब्द महाराष्ट्र कदापिही खपवून घेणार नाही. सत्तेसाठी लाचारी करताना उठसूठ महाराजांच्या घराण्याचा अपमान केलात, तर महाराष्ट्रातील जनता जशास तसे उत्तर देईल'', असे ट्विट चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तसेच, भाजपच्यावतीने एक पत्रकही जारी करण्यात आलं आहे.     

दरम्यान, संजय राऊत यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचे पुरावे घेऊन या विधानावर छत्रपतींच्या घराण्यात जन्मलो हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा काय पुरावा द्यावा हे संजय राऊत यांनीच सांगाव असं शिवेंद्रराजे म्हणाले. तसेच मी किंवा उदयनराजे, संभाजीराजे काही बोललो नव्हतो. संजय राऊत यांनीच वाद सुरू केला होता. त्यामुळे आता संजय राऊत यांनीच वाद संपवावा असेही शिवेंद्रराजेंनी सांगितले. पुण्यात सुरू असलेल्या लोकमत पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात शिवसेना खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांची मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी राऊत यांनी उदयनराजेंनी शिवसेनेवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला होता. त्यावरुन वाद सुरू झाला असून भाजपानेही पक्षाच्यावतीने भूमिका जाहीर केली आहे.  

टॅग्स :चंद्रकांत पाटीलउदयनराजे भोसलेछत्रपती शिवाजी महाराजशिवसेनासंजय राऊत