Join us

IND vs SL मॅचआधी अवतरणार 'क्रिकेटचा देव', १ तारखेला सचिनच्या २२ फुटी पुतळ्याचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2023 21:07 IST

अचूक स्ट्रेट ड्राईव्हचे धडे देण्यासाठी नवोदित क्रिकेटपटूंना सचिनच्या फलंदाजीचे चित्रिकरण दाखवले जातात.

मुंबई : स्ट्रेट ड्राईव्ह म्हणजे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची खासियत. अचूक स्ट्रेट ड्राईव्हचे धडे देण्यासाठी नवोदित क्रिकेटपटूंना सचिनच्या फलंदाजीचे चित्रिकरण दाखवले जातात. याच रोमहर्षक फटक्याच्या शैलीमध्ये असलेल्या सचिनच्या २२ फूट उंच पूर्णाकृती ब्राँझच्या पुतळ्याचे अनावरण वानखेडे स्टेडियमवर १ नोव्हेंबरला होणार आहे.

गुरुवारी संध्याकाळी मुंबई क्रिकेट संघटनेचे (एमसीए) अध्यक्ष अमोल काळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली. २ नोव्हेंबरला वानखेडे स्टेडियमवर भारत-श्रीलंका विश्वचषक सामना होणार असून या सामन्याच्या एकदिवस आधी सचिनच्या पुतळ्याचे अनावरण होईल. पुतळा अनावरण कार्यक्रमाची वेळ मात्र अद्याप ठरली नसल्याची माहिती एमसीएने दिली. या पुतळ्याविषयी काळे यांनी 'लोकमत'ला सांगितले की, 'सचिन तेंडुलकर यांची ओळख असलेला विशेष फटका मारतानाच्या शैलीतील हा पूर्णाकृती पुतळा असणार आहे. त्यांच्या नावाने असलेल्या स्टँडच्या बाजूला हा पुतळा उभारण्यात आलेला असून १ नोव्हेंबरला याचे अनावरण करण्यात येईल. हा पुतळा चबुतऱ्यासह एकूण २२ फूट उंचीचा आहे.'

विजय मर्चंट सँट आणि सचिन तेंडुलकर स्टँडच्या मधोमध हा पुतळा उभारण्यात आला असून सध्या हा संपूर्ण पुतळा झाकण्यात आला आहे. यावेळी एमसीएच्या वतीने विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टिने वानखेडे स्टेडियमवर झालेल्या नूतनीकरणाची माहितीही देण्यात आली.

वानखेडे स्टेडियम झाले सज्ज

  •  प्रेक्षकांसाठी मोफत पिण्याच्या पाण्याची सुविधा
  •  तीन महिन्यांच्या कालावधीत मैदान पूर्णपणे हिरवेगार करण्यात आले.
  •  खेळाडूंच्या दृष्टिने अत्याधुनिक ड्रेसिंग रुम तयार करण्यात आले.
  •  प्रत्येक स्टँडमध्ये प्रेक्षकांसाठी आधुनिक प्रसाधनगृह उभारण्यात आले.
  •  प्रेसिडेंट बॉक्समध्ये बाल्कनी तयार करण्यात आली असून सर्व कॉर्पोरेट बॉक्सचे अत्याधुनिक सुविधांसह नूतनीकरण झाले.

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कपभारत विरुद्ध श्रीलंकासचिन तेंडुलकर