मासवण : एका रात्रीत नऊ घरफोड्या
By Admin | Updated: February 20, 2015 23:14 IST2015-02-20T23:14:36+5:302015-02-20T23:14:36+5:30
चोरट्यांनी सोनेचांदीचे दागिने, रोख रक्कम असा २ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असताना शुक्रवारी पहाटे मासवण गावातील नऊ दरवाजे तोडून लाखोंंचा ऐवज चोरला.

मासवण : एका रात्रीत नऊ घरफोड्या
मनोर/पालघर : पालघरजवळील पडघे येथील तीन घरांचे बुधवारी कडीकोयंडे तोडून लाखो रुपयांचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्याची घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले असताना आज मासवण येथील गावात अज्ञात चोरट्याने आठ घरे फोडून मासवण ग्रा.पं. कार्यालयालाही टार्गेट केले. त्यामुळे चोरांनी पोलिसांपुढे आव्हानच उभे केल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे.
पालघर-बोईसरदरम्यानच्या उमरोळी रेल्वे स्टेशनजवळील पडघे या गावामधील भालचंद्र दत्तात्रेय पाटील, रोहण रामचंद्र पाटील व सुधाकर जगन्नाथ पाटील या तिघांच्या घरांचे कडीकोयंडे तोडून बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सोनेचांदीचे दागिने, रोख रक्कम असा २ लाख १३ हजार रुपयांचा ऐवज चोरल्याच्या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण असताना शुक्रवारी पहाटे मासवण गावातील नऊ दरवाजे तोडून लाखोंंचा ऐवज चोरला.
मासवण येथील हेमंत कृष्णकुमार संखे यांच्या घरी ६५ हजार रोख रक्कम व एक लाख ३४ हजार रुपयांची सोन्याची चेन, मोहनमाळ व चांदीचे पैंजण, कडे, तसेच किरण लक्ष्मण पिंपळे यांच्या घरी ४० हजार रोख रक्कम, भगवान संखे २५०० रुपये, विनय जयवंत संखे, किसन रावजी पवार अशा एकूण ९ लोकांच्या घरी १९ फेब्रुवारीला रात्री अज्ञात चोरट्यांनी घराच्या दर्शनी दरवाजांचे कुलूप-कडीकोयंडे-लॅच अवजड लोखंडी हत्याराने तोडून, उचकून आत प्रवेश करून, कपाटे फोडून त्यातून रोख रक्कम व सोनेचांदीचे दागिने चोरून नेले. अशाच प्रकारे दोन दिवस अगोदर बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुर्ला येथे तीन घरफोड्या तसेच पालघर, सफाळे, तलासरी, कासा अशा अनेक पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरफोड्या, चोऱ्या, लूटमार अशा अनेक घटना घडत आहेत. मात्र, पोलीस चोरट्यांपर्यंत पोहोचण्यास अपयशी ठरत आहेत.
पालघर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर पोलीस अधीक्षक कार्यालय पालघरमध्ये येऊनही चोऱ्या, चेनस्रॅचिंग, हत्या, घरफोड्या इ.च्या प्रमाणात वाढ होत असून पोलीस प्रशासन या कारवाया रोखण्यात अपयशी ठरत असल्याच्या भावना लोकांमधून व्यक्त होत आहेत. या चोऱ्यांच्या तक्रारी संबंधित पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आल्या असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
पोलीस उपअधीक्षक, पालघर जयंत बजबळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, घरफोड्या, चोऱ्या करणाऱ्या चोरट्यांचा शोध लावण्याचे काम प्रगतीपथावर आहे.